शिरोळ : प्रसारमाध्यम न्यूज
शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर ग्रामपंचायतीत राजकीय हलचल उडवणारा अनोखा प्रकार घडला आहे. “ उपसरपंच आम्हाला विश्वासात घेऊन काम करत नाहीत ” असा ठपका ठेवत ग्रामपंचायतीतील सात सदस्यांनी उपसरपंच पूजा शिवगोंडा पाटील यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. अविश्वास ठराव मंगळवारी १०-० अशा एकमताने मंजूर झाला. मात्र, मतदान करताना उपसरपंच पाटील यांचा गोंधळ उडाल्याने त्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे स्वत:विरोधात मतदान करणारी ही पहिलीच घटना घडली आहे.
खिद्रापूर ग्रामपंचायतीमध्ये एकूण अकरा सदस्य असून आरक्षणाअभावी एक जागा रिक्त आहे. दरम्यान, उपसरपंच पूजा पाटील या मनमानी कारभार करीत असल्यामुळे त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. यासाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती.
तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी या ठरावावर निर्णय घेण्यासाठी १२ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेची अधिसूचना काढली होती. या सभेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. या सभेत गुप्त मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. पीठासीन अधिकारी तहसीलदार यांनी मतदानापूर्वी सर्व सदस्यांना मतदान प्रक्रिया सविस्तर समजावून सांगितली. मात्र, मतदान करताना उपसरपंच पाटील यांचा गोंधळ उडाल्याने त्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. परिणामी, सर्वच्या सर्व दहा सदस्यांनी विरोधात मतदान केल्याने हा ठराव एकमताने मंजूर झाला.
ठरावावर झालेल्या मतदानात १०-० असा निकाल लागला आणि उपसरपंच पूजा पाटील यांच्याविरोधात एकमुखी निर्णय झाला. मतदानानंतर पाटील यांना स्वतःच्या विरोधातच मतदान झाल्याचे लक्षात आल्यानंतर गोंधळ उडाला.

पूजा पाटील यांनी तत्काळ आक्षेप घेत, गोंधळून गेल्याने अविश्वासाच्या बाजूने मतदान केल्याचे सांगत फेरमतदानाची मागणी केली. मात्र तहसीलदार हेळकर यांनी ही मागणी फेटाळून लावली. “ मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन निकाल जाहीर झाल्यानंतर पुन्हा मतदान घेणे शक्य नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, या निर्णयावर असमाधान असल्यास योग्य त्या न्यायालयात दाद मागण्याचा सल्लाही दिला.
स्वतःच्या विरोधात मतदान झाल्याचा हा प्रकार सध्या कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला असून, ग्रामपंचायतीतल्या राजकारणाला वेगळंच वळण मिळालं आहे.
———————————————————————————