spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeराजकीयकोल्हापुरात शिंदे गट जोमात : विरोधक आणि सहकारी कोमात..

कोल्हापुरात शिंदे गट जोमात : विरोधक आणि सहकारी कोमात..

अमोल शिंगे : प्रसारमाध्यम न्यूज 

कोल्हापुरातील काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतेज पाटील यांना आज मोठा राजकीय धक्का बसला आहे. त्यांच्या समर्थक असलेले तब्बल १५ नगरसेवकांनी बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे कोल्हापुरातील काँग्रेस पक्षासमोर आणि पर्यायाने आमदार सतेज पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहेच पण संपूर्ण राज्यात भाजप पक्षातील पक्ष प्रवेश वाढत असताना कोल्हापूरमध्येच भाजप, ताराराणी आघाडी सोडून एकनाथ शिंदे गटातच का पक्ष प्रवेश होत आहे, असा प्रश्न कोल्हापूरकरांच्या मनात निर्माण झाला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात एकाच वेळी काँग्रेसचे सतेज पाटील, भाजप आणि ताराराणी आघाडीला धक्का दिला आहे. या तीनही गटातील दोन माजी महापौर आणि २० नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत या सर्वांनी मुंबईत हा पक्षप्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरवर लक्ष केंद्रीत केलं असून अनेक मोठ्या नेत्यांना गळाला लावलं आहे. आधी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचे कट्टर समर्थन शारंगधर देशमुखांना त्यांनी फोडलं. त्यानंतर आता तब्बल २० नगरसेवकांना पक्षात घेतलं आहे. यामुळे कोल्हापूर महापालिकेतील सत्तासमीकरणही यामुळे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कॉंग्रेसच्या माजी नगरसेवकांनी शिंदे गट निवडण्याचं प्रमुख कारण म्हणजे सध्या कोल्हापूर जिल्ह्यावर असणारे शिंदे गटाचे वर्चस्व.. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळालेलं मोठं यश या माजी नगरसेवकांना खुणावत आहे.

आपण पहिल्यांदा शिंदे गटाचे कोल्हापूर जिल्ह्यात असणारे संख्याबळ बळ पाहू..

शिंदे गटाचे धैर्यशील माने हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. ते माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा पराभव करून निवडून आले आहेत.

शिंदे गटाचे कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार :

प्रकाश अबिटकर राधानगरी विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा विजयी झालेले आहेत आणि सध्या ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.  

चंद्रदीप नरके करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.  त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्यावतीने २०२४ मध्ये विधानसभा निवडणूक जिंकली आहे.

राजेश विनायक क्षीरसागर – कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून आमदार आहेत.

अशी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची कोल्हापूर जिल्ह्यातील ताकद. सर्वात महत्वाचं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद शिंदे गटाकडेच आहे. शिंदे गटाची ही ताकद पाहूनच बहुतांशी माजी नगरसेवकांनी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्शभूमीवर शिंदे गटात प्रवेश केल्याचं प्रमुख कारण आहे.

आगामी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चार सदस्यीय निवडणूक पद्धत अस्तित्वात आणली आहे. आता ८१ ऐवजी २५ प्रभागांमधून १०० नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. यासाठी भाजपकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे त्याचबरोबर या नवीन रचनेसाठी भाजपची निवडणुकीची तयारी देखील झाली असण्याची शक्यता आहे. महायुतीतच जागा वाटपावरून वादंग निर्माण होऊ नये म्हणून काही माजी नगरसेवकांना शिंदे गटात महायुतीतील सर्व घटकांच्या सर्वानुमते प्रवेश दिल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.. कोल्हापुरी भाषेत सांगायचे झाले तर “ताटात काय आणि वाटीत काय” … शिंदे गटात प्रवेश केलेल्या काही माजी नगरसेवकांच्या नावावर नजर टाकली तर ते लक्षात येईल. एकूण काय तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या चार सदस्यीय निवडणूक प्रक्रियेत महायुतीचेच नगरसेवक निवडणून आले पाहिजेत, असे हे धोरण असू शकते. हे स्पष्ट होण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक होण्याची वाट पाहावी लागेल.

 

 

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments