कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर शहराच्या भविष्यातील विकासाच्या नकाशात शेंडा पार्क हा परिसर केंद्रस्थानी येऊन ठेपला आहे. शहरातील गर्दी, वाहतूक कोंडी आणि प्रशासकीय कार्यालयांची वेगवेगळी ठिकाणी असलेली ताटातूट यामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशा वेळी शेंडा पार्कमध्ये सर्व शासकीय कार्यालये एकत्र आणण्याचा निर्णय हा दूरदृष्टीचा आणि लोकसुविधेचा आहे.
प्रशासकीय केंद्राची उभारणी
सध्या येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, सर्किट बेंच आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालय अशा महत्त्वाच्या प्रकल्पांचे काम सुरू आहे. १० एकर प्रशासकीय इमारतीसाठी, २७ एकर सर्किट बेंचसाठी, तर ३० एकर वैद्यकीय महाविद्यालयासाठी हस्तांतरित करण्यात आले आहेत. हीच पायरी पुढील विस्ताराला दिशा देणारी ठरेल.येथे सध्या ५३७ एकर जागा उपलब्ध असून, त्यापैकी २१७ एकरातील जागांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आहे.
विविध जमिनींवर उभे राहणारे नवे प्रकल्प
शेंडा पार्क परिसरात एकूण २१५ हेक्टर क्षेत्रा पैकी कृषी विद्यापीठ, आरोग्य विभाग, महापालिका, शासन आणि लेपर कॉलनी यांच्या वेगवेगळ्या जमिनी येथे आहेत.
-
कृषी विभागाच्या जमिनीतून आयटी पार्क, जिल्हा क्रीडा संकुल, जिल्हा ग्रंथालय, मेट्रॉलॉजी व पब्लिक हेल्थ लॅब, तसेच प्री-एनडीए अकॅडमी उभारण्याचे नियोजन आहे.
-
आरोग्य विभागाच्या जमिनीतून सर्किट बेंच, जिल्हाधिकारी कार्यालय आणि क्रीडा संकुलाचा विस्तार होणार आहे.
-
सरकारी हक्कातील जमिनीतून जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस ठाणे, समाज कल्याण वसतिगृह, वखार महामंडळ कार्यालय, अन्न व औषध प्रशासन यांसह नवी प्रशासकीय इमारत उभारली जात आहे.
विकासाचे नवे दालन
या प्रकल्पांची उभारणी केवळ शासकीय कामकाजापुरती मर्यादित राहणार नाही. आयटी पार्कमुळे रोजगार व औद्योगिक संधी वाढतील, प्री-एनडीए अकॅडमीमुळे सैनिकी प्रशिक्षणाचा नवा मार्ग खुलेल, तर क्रीडा संकुलामुळे कोल्हापूरची क्रीडानगरीची ओळख अधिक भक्कम होईल.
नागरिकांसाठी सोय
आजपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश शासकीय कार्यालये शहराच्या विविध भागात पसरलेली असल्याने सामान्य नागरिकांना कामांसाठी मोठी धावपळ करावी लागत होती. शेंडा पार्क मधील या नव्या प्रकल्पांमुळे एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होऊन वेळ आणि खर्च वाचेल. यामुळे प्रशासनाशी लोकांचा संपर्क अधिक सोपा, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्याची अपेक्षा आहे.
कोल्हापूरचा विकास केवळ ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक वाटचालीपुरता मर्यादित न राहता, सुव्यवस्थित प्रशासकीय केंद्राच्या माध्यमातून आधुनिक शहरी नियोजनाच्या नव्या पर्वाला सुरुवात करतो आहे. शेंडा पार्क ही केवळ जागा नसून, येत्या काळात ती जिल्ह्याच्या प्रगतीचा, प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा आणि नागरिकांच्या सुविधांचा प्रमुख केंद्रबिंदू ठरणार आहे.
————————————————————————————————-