मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये मोठा संघटनात्मक बदल होत असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी माजी मंत्री आणि विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे यांची नवी प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. शिंदे १५ जुलै रोजी पदभार स्वीकारण्याची शक्यता असून, पक्षाच्या बैठकीनंतर अधिकृत घोषणा होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये नेतृत्वाची भाकरी अखेर फिरली गेली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या जागी आमदार शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. शरद पवार पश्चिम महाराष्ट्रामधीलच निष्ठावंत चेहरा प्रदेशाध्यक्षपदावर निवडला आहे. त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्यासमोर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पायाला भिंगरी लावून फिरण्याचेच आव्हान असणार आहे. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जातात. शरद पवारांनी आदेश देताच शिंदे यांनी उदयनराजे भोसले, शालिनीताई पाटील यांच्याविरोधातही दंड थोपटले आहेत.
जयंत पाटील यांनी मागणीच केली होती
जयंत पाटील यांनी १० जून रोजी पक्षाच्या वर्धापन दिनीच अध्यक्षपदातून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती. “सात वर्षांची संधी दिली, पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं गरजेचं आहे,” असं ते म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी पद सोडलं आहे.
शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चेत असतानाच शशिकांत शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “संघटनेच्या माध्यमातून पवार साहेबांनी इतिहास घडवला. जयंत पाटील यांच्या सारख्या नेतृत्वाचं कार्य अमूल्य आहे. सध्याचा काळ संघर्षाचा असून आम्ही एकजुटीनं पक्षाची प्रतिष्ठा टिकवू. बेरोजगारी, युवकांचे प्रश्न, शेतकऱ्यांची अडचण या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित करून काम करावं लागेल,” तसेच ते पुढे म्हणाले, “मला संधी मिळाली, तर ते माझं भाग्य समजेन. पवार साहेब माझं दैवत आहेत. आर. आर. पाटील यांच्याप्रमाणे कार्य करण्याचा प्रयत्न करेन. सत्तेचा वारा बदलतो तेव्हा काही लोक मार्गही बदलतात, मात्र आम्ही एकनिष्ठ राहून परिवर्तन घडवू.”
शशिकांत शिंदे ?
-
जन्म : 19 ऑक्टोबर 1963 | मूळ गाव : हुमगाव, जावळी तालुका
-
शैक्षणिक पात्रता : वाणिज्य शाखेचे पदवीधर
-
राजकीय प्रवास :
-
१९९९ : पहिली निवडणूक जावळी मतदारसंघातून विजयी
-
२००९-२०१४: कोरेगाव मतदारसंघाचे आमदार, जलसंपदा मंत्री
-
२०१९ व २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव
-
२०२४ : सातारा लोकसभा निवडणुकीत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याविरोधात पराभव
-
सध्या : विधान परिषद आमदार व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मुख्य प्रतोद
-
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, असं वृत्त सर्वत्र प्रसिद्ध झालं होतं. पण, हे वृत्त म्हणजे खोडसाळपणा असल्याचं स्पष्टीकरण पक्षाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे. मा. जयंत पाटील साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारीत होणे , हा निव्वळ खोडसाळपणा आहे. पक्ष एका नियमानुसार अन् शिस्तीनुसारच चालत असतो, असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.



