मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
आझाद मैदानात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला आता राजकीय पाठिंबा मिळू लागला आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आंदोलकांची भेट घेतल्यानंतर आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार स्वतः मैदानात येऊन शिक्षकांना भेटले आणि त्यांचे मनोबल वाढवले.
शिक्षकांच्या मागण्या न्याय्य असल्याचे नमूद करत पवार म्हणाले, “शिक्षकांना चिखलात बसून आंदोलन करण्याची वेळ येणे दुर्दैवी आहे. निधीची तरतूद न करणारा आदेश म्हणजे कचऱ्यात टाकण्यासारखा आहे.” त्यांनी सरकारवर टीका करत म्हटले की, “मी गेल्या ५६ वर्षांपासून विधानमंडळात काम करतोय, निधी कसा आणायचा हे मला चांगले ठाऊक आहे. ही केवळ इच्छाशक्तीची गरज आहे.”
पवार यांनी सरकारला आवाहन केले की, शिक्षकांचा प्रश्न एका दिवसात सोडवावा. “ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांवर ही वेळ येणे चुकीचे आहे. त्यांच्या हक्कांसाठी आम्ही खांद्याला खांदा लावून लढू,” असेही ते म्हणाले.
राज्यातील सुमारे पाच हजार खासगी विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्याने अनुदान देण्याचा निर्णय ऑक्टोबर २०२४ मधील अधिवेशनात घेण्यात आला होता. मात्र, त्यानंतर १० महिने उलटूनही अद्याप निधीची कोणतीही तरतूद सरकारने केली नाही, त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर ८ व ९ जुलै रोजी राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यामध्ये सध्या ५,८४४ अंशतः अनुदानित खासगी शाळा आहेत. यामध्ये ८२० प्राथमिक, १,९८४ माध्यमिक व ३,०४० उच्च माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण ३,५१३ प्राथमिक, २,२८० माध्यमिक व ३,०४३ उच्च माध्यमिक तुकड्या कार्यरत आहेत. एकूण ८,६०२ प्राथमिक शिक्षक, २४,०२८ माध्यमिक शिक्षक आणि १६, ९३२ उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या शाळांमध्ये कार्यरत आहेत
त्यानंतर काही वेळात शिवेसना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आझाद मैदानात येऊन आंदोलकांशी संवाद साधत त्यांना पाठिंबा दर्शवला. उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी सरकारवर जोरदार निशाणा साधला.आता आपण सगळ्यंनी मिळून भाजपला असा करंट दिला पाहिजे की सत्तेच्या खुर्चीतून ते उडून पडले पाहिजेत,अशा शब्दांत जोरदार चिमटा काढला. यावेळी आदित्य ठाकरेही उपस्थित होते.
५ जूनपासून सुरू असलेल्या या आंदोलनात शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील हजारो शिक्षक सहभागी झाले असून, सरकारच्या उदासीन भूमिकेवर नाराजी व्यक्त होत आहे. विरोधी पक्षांकडून या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला जात आहे.
———————————————————————————————-