मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
नागपूर–गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात मोठा बदल करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड आणि आजरा या तालुक्यांना या महामार्गाच्या मार्गक्रमणातून वगळण्यात आले आहे. गुरुवारी शासनाने महामार्ग आणि भूसंपादन प्रक्रियेबाबतचा जीआर जारी केला असून त्यामध्ये या बदलाचा स्पष्ट उल्लेख आहे.
हा महामार्ग वर्ध्यातील पवनार येथून सुरू होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या गोवा सीमेजवळ संपणार आहे. मूळ आराखड्यानुसार महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार होता. मात्र, महामार्गाला स्थानिक पातळीवर झालेला तीव्र विरोध लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. आता या सहा तालुक्यांऐवजी पर्यायी मार्ग शोधण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) अधिकाऱ्यांनीही या बदलाला दुजोरा दिला आहे.
खर्च आणि कर्जव्यवस्था
या प्रकल्पातील भूसंपादनासाठी २०,७८७ कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. यात १२,००० कोटी रुपये मूळ खर्च असून उर्वरित ८,००० कोटी व्याजापोटी दिले जाणार आहेत. यासाठी आवश्यक कर्ज HUDCO (हुडको) कडून घेतले जाणार आहे. या प्रकल्पामुळे महसूलात घट झाली किंवा हप्ते फेडण्यात अडचण आली, तर राज्य सरकार मदत करेल, असे जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
राजू शेट्टींची प्रतिक्रिया
महामार्गाच्या विरोधकांपैकी हातकणंगलेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी शासनाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. शेट्टी म्हणाले, “जरी सहा तालुके वगळले असले तरी गोव्याला जाण्यासाठी महामार्गाला कोल्हापुरातूनच मार्ग काढावा लागेल. कोल्हापूरच्या इतर भागांतही या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे.”
सध्या पवनारपासून सांगली जिल्ह्यापर्यंतच्या रस्त्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात सिंधुदुर्ग मार्गे गोव्यापर्यंत महामार्ग पोहोचवला जाणार आहे.
—————————————————————————————————–
Be the first to write a review