spot_img
गुरूवार, नोव्हेंबर 6, 2025

9049065657

Homeइतिहासहोलोग्राफिक शोमधून शाहू महाराजांना अनुभवता येणार

होलोग्राफिक शोमधून शाहू महाराजांना अनुभवता येणार

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची माहिती आणि त्यांचे विचार जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावेत, या हेतूने कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये, म्हणजेच शाहू महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या ऐतिहासिक वास्तूमध्ये, होलोग्राफिक शोमधून राजर्षी शाहू महाराजांना जवळून अनुभवता येणार आहे.

शासनाच्या वतीने एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला असून, या उपक्रमांतर्गत पहिल्यांदाच होलोग्राफिक शोद्वारे शाहू महाराज लोकांशी संवाद साधताना पाहायला मिळणार आहेत. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विकास निधीतून हे काम पूर्ण करण्यात आले आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रयत्नातून या योजनेला गती मिळाली आहे.

होलोग्राफिक शोमध्ये शाहू महाराजांनी आपल्या जीवनकाळात दिलेली निवडक व महत्त्वाची भाषणे घेण्यात आली असून, त्यांचे सादरीकरण आधुनिक होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, शोमध्ये वापरलेले पेहराव त्या काळातील मूळ वेशभूषेच्या आधारे तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना इतिहासाचा एक सजीव अनुभव मिळतो.

याप्रसंगी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासह आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ जयसिंगराव पवार, इंद्रजीत सावंत आणि वसंतराव मुळीक, उदय सुर्वे, अर्चना पाटील उपस्थित होते.

या संकल्पनेचे दिग्दर्शन किरणसिंह चव्हाण यांनी केले असून, फिल्म निर्मिती व दिग्दर्शन त्यांच्या टीमकडून करण्यात आले आहे. इंद्रजित सावंत यांनी ऐतिहासिक संशोधन, लेखन आणि शाहू महाराजांच्या भाषणांचे संकलन केले आहे. शाहू महाराजांच्या भाषणासोबतच यामध्ये कोल्हापूरच्या कुस्ती इतिहासावर आधारित एक माहितीपटही दाखवण्यात येतो. येत्या काळात शाहू महाराज आणि कृषी धोरणांवर, तसेच शाहू महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील ऐतिहासिक संबंधांवर आधारित भाषणेही होलोग्राफिक शोमधून सुरू केली जाणार आहेत. दोन शोसह चार माहितीपट तयार करणे, थिएटरची निर्मिती, होलोग्राफिक सेट आणि इतर तांत्रिक बाबी इत्यादींसाठी दीड कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

या ठिकाणी ३० आसनक्षमतेचे मिनी थिएटर तयार करण्यात आले असून, म्युझियममधील इतर संग्रह पाहिल्यानंतर या थिएटरमध्ये शेवटी डॉक्युमेंटरी व होलोग्राफिक शो दाखवण्याची रचना आहे. एकावेळी ३० प्रेक्षक बसून हा अनुभव घेऊ शकतात. हा शो १५ मिनिटांचा असून, दिवसातून अनेक वेळा त्याचे सत्र आयोजित केले जातील.

हा प्रकल्प केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून येणाऱ्या पर्यटकांसाठीही आकर्षण ठरणार आहे. इतिहासाला नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा हा अभिनव प्रयत्न ठरणार आहे. सध्या विद्यार्थ्यांसाठी हा शो सुरू करण्यात आला आहे. पुढील काळात प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून कार्यक्रमात बदल व विस्तार करण्यात येणार असल्याचेही आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments