मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ८ आणि ९ जुलै रोजी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र, शिक्षण विभागाने या पार्श्वभूमीवर स्पष्ट केले आहे की, या काळात राज्यातील कोणतीही शाळा बंद राहणार नाही.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक महेश पालकर यांनी एक परिपत्रक जारी करत शाळा सुरू राहतील, असा स्पष्ट आदेश दिला आहे. या आदेशात नमूद करण्यात आले आहे की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ८ व ९ जुलै रोजी शाळांचे नियमित वेळापत्रक सुरू ठेवण्यात यावे.
पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती
शिक्षकांच्या आंदोलनामुळे अनेक पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू राहतील की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. काही शाळांमध्ये शिक्षक उपस्थित राहतील की नाही यावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मात्र, शिक्षण विभागाच्या आदेशामुळे आता शाळा बंद राहणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.
शिक्षक संघटनांचा निर्धार
शिक्षक संघटनांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्या जसे की अनुदान मंजुरी, सेवा सुरक्षा आणि वेतन प्रश्न – यावर सरकारकडून तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. आंदोलनकर्त्यांचा दावा आहे की, शासनाने वारंवार आश्वासन दिले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने आंदोलन करणे भाग पडले आहे.
यापूर्वी, हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अनुदान आणि इतर मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याची घोषणा केली होती. या आंदोलनामुळे ८ आणि ९ जुलै रोजी शाळांना सुट्टी असेल, याची पालकांनी नोंद घेऊन आपले नियोजन करावे, असे आवाहन देखील करण्यात आले होते. नियोजित सुट्टी नसतानाही अनेक विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळा या दोन दिवसांत बंद राहतील, अशी शक्यता वर्तवली जात होती.
राज्यातील शाळा ८ आणि ९ जुलै रोजी खुल्या राहणार असून, विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, शिक्षकांच्या आंदोलनाकडे शासन कोणती भूमिका घेते आणि या मुद्द्यावर तोडगा कसा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
——————————————————————————————