कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
पर्यावरण संवर्धन व हरित क्षेत्र वाढविण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने १५ जून पासून ३० सप्टेंबर अखेर विविध प्रकारच्या झाडांची रोपे सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ग्रामपंचायती व शाळांना या रोपांची मोफत उपलब्धता देखील करून दिली जाणार आहे.
जिल्ह्यातील कोल्हापूर – सदर बझार, कागल, मलकापूर – मौजे वालूर आणि गगनबावडा – मौजे साळवन येथील शासकीय रोपवाटिकांमध्ये सुमारे २ लाख २६ हजार रोपे उपलब्ध करण्यात आली आहेत. या रोपांमध्ये फळझाडे, इमारती लाकूड देणारी झाडे, औषधी व फुलझाडांचा समावेश असून, यामध्ये स्थानिक व पर्यावरणास पूरक प्रजातींना प्राधान्य देण्यात आले आहे.
सध्या विक्रीसाठी ठेवलेली ही रोपे सुमारे ९ ते १८ महिन्यांची असून त्यांची उंची सुमारे २ ते ३ फूट आहे. या रोपांची वाढ व गुणवत्ता चांगली असून, नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाने केले आहे.
सवलतीच्या दरामुळे सामान्य नागरिक, शेतकरी, शाळा व विविध संस्थांना आपल्या परिसरात वृक्षारोपण करणे सुलभ होणार आहे. यामुळे जिल्ह्यात हरित क्षेत्र वाढण्यास हातभार लागणार असून, पर्यावरण संवर्धनासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
रोपे घेण्यासाठी इच्छुकांनी संबंधित शासकीय रोपवाटिकांमध्ये संपर्क साधावा व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा, असेही विभागाकडून सांगण्यात आले आहे.
उपलब्ध वृक्षांच्या प्रजाती अशा :
आंबा, जांभूळ, आवळा, काजू, बदाम, शेवगा, सीताफळ, पपई, फणस, पेरू, म्यांजियम, बहावा, पाडळ, बांबू, चिंच, रेन ट्री, गुलमोहर, करंज, लिंबू, बेल, भद्राक्ष, सि.ओक, सागवान, अर्जुन, कडुलिंब, मोहगणी, जारूळ, पिंपळ, वड, शिसू, हेळा, हाडजो, गुलाब, गुळवेल, देवबाभळ,सीतेचा अशोक, चेरी, शेंद्री, गोल्डन डूरांडा, कदंब, करबख, प्लेटोफॉर्म, मोगरा, उंबर, ब्रा.ब्रश, शिवन, शंकाशूर, बकुळ, टेंबुर्णी, सिमारुबा, पाम, झेंडू, रॉ क्याशिया, क्याशिया, चेंडूफळ, मेहंदी, अशोक, चाफा, अंजन, गुळभेंडी, विलायती चिंच, कडीपत्ता, तुळस, गवती चहा, बोगनवेल, जास्वंद, कांचन, जारूळ.



