चंद्रपूर : प्रसारमाध्यम न्यूज
जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर भागातील सफारी आजपासून पुढील तीन महिन्यांसाठी बंद करण्यात आली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, १ जुलैपासून ३० सप्टेंबरपर्यंत सफारी बंद राहणार आहे.
पावसाळ्यामुळे जंगलातील अरुंद आणि कच्चे रस्ते गॅलरींसाठी धोकादायक ठरतात. रस्ते चिखलाचे होत असल्याने अपघाताचा धोका वाढतो. शिवाय, पावसाळा हा काळ वन्यजीवांसाठी प्रजननाचा असतो. त्यामुळे प्राणी, पक्षी तसेच कीटक यांना या काळात मानव हस्तक्षेप टाळता यावा, यासाठी सफारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यंदाच्या पर्यटन हंगामात ताडोबाला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी तब्बल ४ लाख ६ हजार पर्यटकांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. यामध्ये ५० हजार परदेशी पर्यटकांचा समावेश होता. ताडोबातील व्याघ्र दर्शनासाठी देशविदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात.
सध्या ताडोबाचा कोअर भाग बंद असला तरी बफर झोनमधील काही पर्यटन गेट सुरू राहतील. तथापि, पावसाळ्यात बफरमध्ये देखील काही मर्यादा लागू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
ताडोबा पर्यटन आकडेवारी ( २०२५ )
-
एकूण पर्यटक : ४ लाख ६ हजार
-
परदेशी पर्यटक : ५० हजार
जंगल संवर्धनासाठी आणि वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने वेळोवेळी असे उपाययोजना राबविल्या आहेत. पावसाळ्यानंतर ऑक्टोबरपासून पुन्हा ताडोबा सफारीसाठी पर्यटकांना परवानगी मिळणार आहे.
——————————————————————————



