कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शिवसेना ठाकरे गटात कोल्हापूर जिल्ह्यातील अंतर्गत संघर्ष दिवसें दिवस उघड होत चालला आहे. जिल्हाप्रमुख पदासाठी अनेक इच्छुक असताना, थेट रवीकिरण इंगवले यांची नियुक्ती करण्यात आली. या निवडीवरूनच पक्षातील वाद उफाळला असून, वरिष्ठ नेते संजय पवार यांनी थेट उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
उपनेत्याला माहित नसताना जिल्हाप्रमुखाची निवड ?
संजय पवार म्हणाले, “कोल्हापूरसारख्या महत्वाच्या जिल्ह्याचा प्रमुख ठरवला जातो आणि पक्षाच्या उपनेत्यालाच त्याबद्दल माहिती नसते, हे पक्षासाठी चिंतेचं कारण आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात काहीतरी वेगळं सुरू आहे. विश्वासार्हता आणि पारदर्शकता संपलीय का? ” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
इंगवले-पवार वाद चिघळला, ऑडिओ कॉल व्हायरल
संजय पवार आणि रवीकिरण इंगवले यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांमधील फोनवरचा वादाचा ऑडिओ व्हायरल झाला होता. त्या प्रकरणावरूनही मोठी चर्चा रंगली होती. जिल्हाप्रमुखपदाच्या निमित्ताने हा वाद आता अधिकच चिघळला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गट सध्या अस्तित्वाच्या लढाईत अडकला आहे. बहुतांश नेते शिंदे गटात गेले आहेत, तर पदाधिकारी ठाकरे गटात राहिले आहेत. त्यामुळे संघटनात्मकदृष्ट्या ठाकरे गटाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशातच पदाधिकाऱ्यांमधील हा उघड वाद पक्षाला आणखी कमजोर करणारा ठरत आहे.
हक्काचे मतदारसंघही गमावले
केवळ संघटन नव्हे तर ठाकरे गटाने कोल्हापूरमधील हक्काचे मतदारसंघही गमावले आहेत. कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जात असे, मात्र सध्या ती जागा काँग्रेसकडे आहे. लोकसभा पातळीवरही कोल्हापूरची जागा शाहू महाराजांसाठी काँग्रेसला सोडण्यात आली.
राधानगरीतही घडामोडी, राष्ट्रवादीचा प्रवेश
राधानगरीची जागा शिवसेनेला बदल्यात मिळाली होती. मात्र, त्या मतदारसंघातील माजी आमदार के. पी. पाटील यांनी पुन्हा एकदा राजकीय पलटी मारत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला येथेही धक्का बसला आहे.
या सर्व घडामोडींमुळे कोल्हापूर जिल्ह्यात ठाकरे गट अधिकच अडचणीत सापडला आहे. पक्षसंघटना मजबूत करायची की अंतर्गत वाद मिटवायचे, हा मोठा प्रश्न ठाकरे गटासमोर उभा आहे. आता खुद्द उद्धव ठाकरे आणि मुंबईतील वरिष्ठ नेते या वादावर कसा तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
——————————————————————————————-



