मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वी पगार देण्याचे आदेश शासनाने दिल्यानंतर, एस.टी. कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ मिळावा, यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी आजच पगाराची फाईल वित्त मंत्रालयाकडे सादर करण्याचे आदेश परिवहन विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.
…तर मंगळवारपूर्वी पगार खात्यात
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जर वित्त विभागाकडून निधी सोमवार पर्यंत मंजूर झाला, तर एस.टी. कर्मचाऱ्यांना सोमवारी ( २५ ऑगस्ट) किंवा मंगळवारी ( २६ ऑगस्ट) पगार मिळण्याची शक्यता आहे. हे घडले, तर यंदा अनेक महिन्यांनंतर पहिल्यांदाच एस.टी. कर्मचाऱ्यांना वेळेत आणि सणाआधीच पगार मिळणार आहे.
कर्मचाऱ्यांचा दिलासा
गेल्या काही महिन्यांपासून एस.टी. कर्मचाऱ्यांना नियमितपणे पगार मिळण्यात अडचणी येत होत्या. अनेकदा महिन्याच्या शेवटी वा पुढील महिन्यात पगार होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. विशेषतः सणासुदीच्या काळात खर्चाचे ओझे अधिक असल्याने वेळेवर पगार मिळावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने केली जात होती.
परिवहन मंत्री सरनाईक यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे, जर निधी वेळेत मंजूर झाला, तर गणपती बाप्पाच्या आगमनाआधीच पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल आणि त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
—————————————————————————————-