मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
मराठी रंगभूमीवर पुन्हा एकदा जुन्या पण अजरामर नाटकांचा सुगंध दरवळू लागला आहे. पु. ल. देशपांडे लिखित सुंदर मी होणार आणि घाशीराम कोतवाल च्या हिंदी आवृत्तीनंतर आता प्रख्यात नाटककार विजय तेंडुलकर यांचे वादळी आणि वास्तववादी नाटक सखाराम बाइंडर पुन्हा रंगमंचावर गाजण्यासाठी सज्ज झाले आहे.
स्त्री–पुरुष संबंधांचे करकरीत वास्तव मांडत समाजाला धक्का देणारे हे नाटक १९७२ साली रंगभूमीवर आले होते आणि तेव्हापासूनच त्याच्या तीव्र कथानकामुळे चर्चा आणि वादांना तोंड द्यावे लागले होते. आज पाच दशकांनंतरही त्याची जादू कमी झालेली नाही.
या पुनरागमनात विशेष आकर्षण ठरणार आहे सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांची सखाराम ही दमदार भूमिका. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुण्यात या नाटकाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. सुमुख चित्र आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजच्या सहकार्याने हे नाटक रंगभूमीवर येत असून, या निर्मिती संस्थेचे हे तिसरे नाट्यपुष्प आहे.
नाटकाविषयी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, ” हे नाटक माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. रसिकांना पुर्नप्रत्ययाचा आनंद देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत. आजच्या पिढीने हे नाटक पाहिलेले नाही, त्यांनाही याच्या निमित्ताने ते जाणून घेता येणार आहे.”
या नाटकात सयाजी शिंदे यांच्यासोबत नेहा जोशी, चरण जाधव, अनुष्का बोऱ्हाडे आणि अभिजीत झुंजारराव प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. मराठी रंगभूमीच्या इतिहासातील एक ठळक पर्व असलेल्या सखाराम बाइंडरच्या नव्या सादरीकरणाची रंगप्रेमींमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
————————————————————————————–