कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
अस्ताना येथे पार पडलेल्या आशियाई वेटलिफ्टिंग ज्युनियर स्पर्धेत मनमाडचा साईराज परदेशी ब्राँझपदक पटकावले. या कामगिरीसह साईराजने आशियाई स्तरावर पदक जिंकण्याची आपली मालिका कायम ठेवली आहे. त्याच्या या यशामुळे महाराष्ट्रातील आणि विशेषतः नाशिक जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
साईराजची जिद्द, मेहनत आणि खेळावरील निष्ठा ही तरूणांना प्रेरणा देणारी आहे. आर्थिक अडचणी असूनही आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर साईराजने दाखवून दिले की, संघर्षाची तयारी असेल तर कोणतीही शिखरे सर करता येतात. या यशाबद्दल विविध स्तरावरून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यात तो आणखी मोठी कामगिरी करून देशासाठी सुवर्णपदक जिंकेल, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहे.
मनमाडचा साईराज परदेशी याने आपल्या कर्तृत्वाने पुन्हा एकदा राज्याचा आणि देशाचा अभिमान वाढवला आहे. भंगार व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातून येणारा साईराज वडिलांच्या विरोधाला न जुमानता वेटलिफ्टिंगच्या क्षेत्रात उतरला आणि अथक परिश्रमांमुळे त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवली आहे.
प्रवीण व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली साईराजने वेटलिफ्टिंगचे धडे गिरवले. डिसेंबरमध्ये आशियायी युवा स्पर्धेत ८१ किलो गटात एकूण ३१० किलो वजन पेलले होते. यावेळी त्याने ८८ किलो गटात ३३८ किलो वजन पेलण्यात यश मिळवले. त्याने स्नॅचमध्ये १५२ किलो, तर क्लीन अँड जर्कमध्ये १८६ किलो वजन उचलले.