मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
जेष्ठ क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून अचानक निवृत्ती घेतल्यामुळे अध्यक्षपद सध्या रिक्त आहे. त्यांच्या जागी सचिन तेंडुलकर यांची एकमताने निवड होऊ शकते, अशी चर्चा सध्या जोरात सुरु आहे. तेंडूलकर यांच्याशी अनौपचारिक चर्चा झाली असल्याची माहिती वृत्तांतात आहे. क्रिकेटमधील अपूर्व योगदानामुळेच सचिन तेंडूलकर यांची निवड होऊ शकते, असे म्हंटले जाते. बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा; तसेच निवडणूक २९ सप्टेंबरला होणार आहे. त्याच दिवशी नव्या अध्यक्षांची निवड होईल.
या पदावर सचिन यांची निवड झाली तर, मागील दीड दशकांमध्ये निवृत्त झालेल्या क्रिकेटपटूंना बोर्डात नेतृत्व करण्याची संधी देण्याची ही दुसरी वेळ ठरेल. २०१९ मध्ये भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष झाला होता. त्यानंतर १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघातील रॉजर बिन्नी यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. बीसीसीआयच्या नियमांनुसार ७० वर्षांची वयोमर्यादा पूर्ण झाल्यानंतर बिन्नी यांनी अलीकडेच पद सोडले. सध्या उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्याकडे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून पदभार सोपवण्यात आला आहे. अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, संयुक्त सचिव, कोषाध्यक्ष आणि आयपीएल अध्यक्ष यासारख्या प्रमुख पदांसाठी अधिकृत निवडणुका सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) होणार आहेत.
सध्या सुरु असलेल्या चर्चांनुसार, अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी दरम्यान सचिनशी अनौपचारिक बोलणं झालं आहे. एका वरिष्ठ राजकीय व्यक्तीने अलीकडेच इंग्लंडमध्ये सचिनची भेट घेऊन बीसीसीआयमधील सर्वोच्च पद स्वीकारण्यासंदर्भात चर्चा केल्याचे मानले जात आहे. या ऑफरला सचिनचा प्रतिसाद, होकारार्थी आहे की नकारार्थी हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
मागील काही वर्षापासून क्रीडा संघटनांमध्ये खेळाडूंचे प्रतिनिधित्व वाढवण्यावर केंद्र सरकारने भर दिले आहे. ऑलिम्पिक पदक विजेत्या राज्यवर्धन सिंह राठोड यांच्याकडे केंद्रीय क्रिडा मंत्रीपद सोपवण्यात आलं होतं. सध्या, माजी धावपटू पी.टी. उषा भारतीय ऑलिंपिक असोसिएशनच्या प्रमुख आहेत. या ट्रेण्डनुसार सचिनचा बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी विचार सुरु असल्याचं सांगितलं जात आहे.