मॉस्को / बीजिंग : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
अमेरिका आणि रशियामधील वाद चिघळत असतानाच, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ वाढवून एक प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, भारताने हा दबाव झुगारून रशियाशी संबंध अधिक दृढ करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल सध्या मॉस्कोमध्ये असून, त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर पुतीन यांचा भारत दौरा लवकरच होणार असल्याचे अधिकृतपणे स्पष्ट झाले आहे.
या घटनाक्रमाने हे अधोरेखित झाले आहे की भारत अमेरिकेच्या धमक्यांना भीक घालण्याच्या मनःस्थितीत नाही. भारताने पुन्हा एकदा सांगितले आहे की रशिया हा भारताचा पारंपरिक व विश्वासू मित्र आहे, आणि व्यापार व राजकीय संबंध सहजपणे तोडले जाणार नाहीत.
दरम्यान, अमेरिकेचे दूत स्टीव्ह विनकॉफ देखील अलीकडेच रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांनी पुतीन यांच्याशी चर्चा केली, परंतु त्या भेटी मधून कोणताही ठोस करार किंवा प्रगती झाली नाही. त्यानंतर ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ अधिक वाढवण्याचा निर्णय घेतला, यामुळे भारत-अमेरिका संबंध आणखीनच बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तीन महाशक्ती एकाच व्यासपीठावर
या सगळ्या घडामोडी घडत असतानाच, या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला भेट देऊन एससीओ (SCO – शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन) शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. २०२० च्या गलवान संघर्षानंतर मोदींचा हा चीन दौरा दोन्ही देशांमध्ये संबंध सामान्य करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. याआधी ऑक्टोबर २०२४ मध्ये कझान येथे झालेल्या ब्रिक्स परिषदेत मोदी व शी जिनपिंग यांच्यात झालेल्या चर्चेमुळे सीमावाद कमी करण्याची सहमती तयार झाली होती.
रशिया, भारत आणि चीन या तिन्ही देशांनी पुन्हा एकत्र येत जागतिक राजकारणात एक नवे समीकरण उभे केले आहे. सध्या या तिन्ही महाशक्तींना अमेरिकेच्या टॅरिफ दबावाचा सामना करावा लागत असून, त्यामुळे एकमेकांशी सहकार्य वाढवण्याची अनिवार्यता स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पुढील भेटी आणि करार हे अमेरिका-युरोपच्या वर्चस्वाला थेट आव्हान उभं करू शकतात.
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणांना भारताने दिलेला हा स्पष्ट आणि ठाम प्रत्युत्तर आहे. डोभाल-पुतीन भेट, पुतीन यांचा भारत दौरा, मोदींचा चीन दौरा आणि भारत-रशिया-चीन तिघांची एकत्र बैठक हे सर्व घटक जागतिक राजकारणात एक नवीन संतुलन निर्माण करण्याच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहेत. भारत आता फक्त संतुलन साधणारा देश राहणार नसून, स्वतंत्र धोरण आणि स्वाभिमानी भूमिका घेणाऱ्या जागतिक शक्तीच्या रूपात पुढे येत आहे.
—————————————————————————————–