कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
जागतिक घडामोडीत अमेरिका भारतावर दबाव आणू पाहत आहे. याचवेळी रशिया भारताशी मैत्री अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. रशियाने भारताला दिल्या जाणाऱ्या कच्च्या तेलावर मोठी सूट जाहीर केली आहे. या निर्णयामुळे भारताला थेट आर्थिक लाभ मिळणार आहे. यामुळे मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता अधिक वाढण्याची शक्यता अधिक आहे. याचा परिणाम काही दिवसात इंधन तेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, रशियाने भारतीय रिफायनरीजसाठी दिली जाणारी सवलत ३ डॉलरवरून वाढवून ४ डॉलर प्रति बॅरल केली आहे. काही महिन्यांपूर्वी ही सवलत फक्त १ डॉलर होती. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये भारताला आयात होणारे रशियन तेल आधीपेक्षा अधिक स्वस्तात मिळेल. जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार असलेल्या भारतासाठी हा निर्णय मोठा दिलासा आहे.
अमेरिका दीर्घकाळापासून भारतावर दबाव आणत आहे की रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करू नये. ट्रम्प प्रशासनाने तर भारतावर आयात शुल्कही ५० टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. व्हाईट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांनी भारतावर आरोप केला होता की तो रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करून ते युरोप व आशियामध्ये उच्च दराने विकतो आणि त्यामुळे अप्रत्यक्षपणे रशिया-युक्रेन युद्धाला निधी मिळतो.
या घडामोडींमुळे भारत-रशिया संबंध अधिक दृढ होत आहेत. अलिकडील एससीओ शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियासोबतचे संबंध खूप खास असल्याचे सांगितले. एकंदरीत, अमेरिका भारताला रशियापासून दूर ठेवू पाहत असताना, रशिया सवलती देऊन भारताला अधिक जवळ खेचत आहे. जागतिक भू-राजकारणाच्या या खेळात भारताने स्वतःचे हितसंबंध सर्वोच्च ठेवल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.