कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूरच्या धावपटूंनी दक्षिण आफ्रिकेतील जगप्रसिद्ध आणि सर्वाधिक खडतर समजल्या जाणाऱ्या ९० किलोमीटर लांबीच्या ‘कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन’ शर्यतीत यशस्वीरित्या सहभाग घेतला. या स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांचा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार केला. यापैकी उपस्थित चेतन चव्हाण, दिलीप जाधव, डॉ. विजय कुलकर्णी, गोरख माळी, सुषमा रेपे आणि डॉ. पराग वाटवे यांना पुष्पगुच्छ, शाल आणि पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. यांच्या सह अमोल यादव, सचिन बुरसे, स्वरूप पुजारी, विजय पाटील, अम्रपाल कोहली आणि डॉ. केतकी साखरपे यांनीही या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी उपजिल्हाधिकारी (महसूल) डॉ. संपत खिलारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अमोल येडगे – ‘तुमची कामगिरी कोल्हापूरमधील नवोदित आणि हौशी धावपटूंना जागतिक स्तरावर धावण्याची प्रेरणा देणारी आहे. या स्पर्धेच्या निकालातून प्रेरणा घेऊन पुढील स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा आहे.’ यावेळी श्री. येडगे यांनी स्पर्धेनिमित्त आलेल्या अनुभवांबाबत माहिती जाणून घेत सर्व स्पर्धकांशी संवाद साधला आणि पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्पर्धकांनी स्पर्धेतील अनुभव सर्वांसमोर सांगितले. ही शर्यत पीटरमैरिट्सबर्ग ते डर्बन या मार्गावर पार पडली. या स्पर्धेत कोल्हापूरच्या चमूमध्ये दोन महिला धावपटूसह एकूण १२ धावपटूंनी सहभाग घेतला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने सराव, नियोजन आणि मानसिक तयारी यांचा समन्वय साधत हे यश मिळवले असल्याचे त्यांनी सांगितले. कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन केवळ लांब अंतराची शर्यत नसून, ती शरीर, मन आणि इच्छाशक्तीची कसोटी आहे. यंदाच्या मार्गात जवळपास १,२०० मीटर उंची होती, तसेच सात मोठे डोंगर आणि अनेक छोट्या टेकड्या पार कराव्या लागल्या, असेही त्यांनी नमूद केले. हवामानातील तीव्र बदल, थंड हवामान आणि तापमानातील झपाट्याने होणारी वाढ यावर मात करत प्रत्येकाने अंतिम रेषा गाठली, असे स्पर्धकांनी सांगितले.
‘कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन’ – या शर्यतीला १९२१ साली सुरुवात झाली असून, यंदाचे ९८ वे वर्ष होते. जगभरातील विविध देशांमधून २५,००० हून अधिक धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. यामध्ये भारतातून ४०० पेक्षा अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला, त्यापैकी ५० महिला धावपटू होत्या, ही भारतासाठी विशेष अभिमानाची बाब ठरली. कोल्हापूरच्या चमूने केवळ वैयक्तिक यशच मिळवले नाही, तर एकमेकांना प्रेरणा देत, उत्साह वाढवत आणि खऱ्या अर्थाने सांघिक कार्याचे दर्शन घडवत ही शर्यत यशस्वी केल्याचे सर्व स्पर्धकांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
—————————————————————————————————–