”शाही दसरा” आता राज्याचा प्रमुख महोत्सव

कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

0
138
Kolhapur's royal Dussehra festival has now been included in the list of major festivals of the state. (Archived photo)
Google search engine
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव आता राज्याच्या प्रमुख महोत्सवांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने या महोत्सवाला अधिकृत मान्यता देत राज्य प्रमुख महोत्सवाचा दर्जा दिला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली .
शाही दसरा महोत्सवातील एकत्रित छायाचित्र
कोल्हापूर शहरास पौराणिक व ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. कोल्हापूर जिल्हा ही राजर्षी शाहू छत्रपती यांची जन्मभूमी व कर्मभूमी आहे. कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून साजरा केला जात असून म्हैसूरच्या दसरा उत्सवाप्रमाणेच लोकप्रिय होत असलेल्या कोल्हापूरच्या दसरा महोत्सवांतर्गत स्थानिक लोककला, लोकनृत्ये, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, शिवकालीन युद्धकलांचे सादरीकरण सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे आयोजित करण्यात येतात. जेणेकरून या कलांना व कलाकारांना प्रोत्साहन मिळावे व भावी पिढीला या कलांची माहिती व्हावी.
कोल्हापूरमध्ये साडेतीन शक्तीपीठापैकी एक पीठ म्हणजेच श्री अंबाबाईचे मंदीर आहे. शारदीय नवरात्र उत्सवामध्ये श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी किमान ३०-४० लाख पर्यटक राज्यातील तसेच देशातील विविध भागांमधून या ठिकाणी येत असतात. १९१ वर्षापूर्वी २ ऑक्टोबर रोजी आलेल्या दसरा सणादिवशीच भवानी मंडप कमानीचे उद्घाटन करण्यात आले होते .त्यामुळे भवानी मंडप या इमारतीस यावर्षी २ ऑक्टोबर २०२५ रोजी १९१ वर्षे पूर्ण होत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये नुकताच जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झालेल्या मराठा लष्करी भूप्रदेश या शृखंलेतील किल्ले पन्हाळगड तसेच श्री क्षेत्र जोतिबा मंदीर, गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य, कणेरीमठ, आंबा घाट, खिद्रापूर येथील स्थापत्य कलेसाठी जगप्रसिद्ध कोपेश्वर मंदीर इत्यादी पर्यटनाच्या दृष्टीने अनेक प्रेक्षणीय स्थळे उपलब्ध आहेत. तसेच पर्यटकांना राहण्यासाठी मुबलक प्रमाणात हॉटेल्स, लॉजिंग, धर्मशाळाही उपलब्ध आहेत. 

दसरा महोत्सवास राज्याचा मुख्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे पर्यटक कोल्हापूर मध्ये किमान दोन दिवस मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी पन्हाळा किल्ला, नृसिंहवाडी इत्यादी स्थळांना भेट देऊन पर्यटनाचा आनंद घेऊ शकतील. यामुळे कोल्हापूरच्या स्थानिक रोजगारमध्ये वाढ होण्यास तसेच विकासदर वाढीस मदत मिळू शकेल.

जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी कोल्हापूर शाही दसरा महोत्सवास राज्य प्रमुख महोत्सवाचा दर्जा मिळण्याबाबत प्रस्ताव शासनास सादर करून मंत्रालयीन स्तरावर विशेष पाठपुरावा केला, त्यामुळेच कोल्हापूर शाही दसरा महोत्सवाचा पर्यटन विभागामार्फत सन २०२५-२६ या वित्तीय वर्षातील आयोजित केल्या जाणाऱ्या महोत्सवाच्या दिनदर्शिकेमध्ये प्रमुख पर्यटन महोत्सव (सन २०२५-२६ ) या यादीत समावेश झाला आहे. २०२३ साली दसरा महोत्सवास राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याबाबत घोषणा झाली होती तथापि त्यावर अद्यापपर्यंत काही कार्यवाही झाली नव्हती .

————————————————————————————————–
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here