कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरोत्थान महाभियानातर्गत कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात केलेले शंभर कोटींच्या रस्त्यांची पहिल्या पावसाळ्यात नव्हे तर पहिल्या पावसातच दैना उडाली आहे. या महाभियानातर्गत १६ प्रमुख रस्ते केले. मात्र यापैकी काही रस्ते १५ मे ते १५ जून दरम्यान झालेल्या पावसाने उखडलेले आहेत. काही रस्त्यांचा वरचा बारीक खडीचा थर सुटला आहे.
दसरा चौक ते रेसकोर्स नाका हा या महाभियानातील मुख्य आणि वर्दळीचा रस्ता. या रस्त्याचा वरचा बारीक खडीचा थर (सीलकोट) उखडून त्याखालील मध्यम खडीचा थर (बेसकोट) उघडा पडला आहे. याच मार्गावर बेसकोटही पाण्याच्या खजिन्याजवळ उखडला गेला. दसरा चौक, खासबाग मैदान, मिरजकर तिकटी, शिंगोशी मार्केट या ठिकाणी नव्याने केलेला रस्ता उखडला गेला आहे. या महाभियानातील सर्रास रस्त्यांची वरील बारीक खडीचा थर निसटला आहे.
दसरा चौक ते आयटीआय कॉर्नर, सुभाष रोड ते भोले हॉस्पिटल, लक्षतीर्थ चौक ते अण्णासो शिंदे स्कूल, माऊली चौक ते गोखले कॉलेज- विश्वजीत हॉटेल, निर्मिती कॉर्नर ते कळंबा जेल, राधानगरी रोड ते गंगाई लॉन, शाहू सेना चौक ते एसटीपी प्रकल्प, अनुग्रह हॉटेल ते लठ्ठे पुतळा, संघवी बंगला, विश्वेश्वरया हॉल ते चंदवाणी हॉल, हॉटेल रसिका ते जाधववाडी रिंगरोड,अँपल हॉस्पिटल ते वसंतनगर ते जिल्हा परिषद कंपाऊंड, गोल्ड जिम ते सदर बाजार चौक, लक्ष्मीपुरी जैन मंदिर ते पान लाईन, धान्य बाजार, वृषाली आयलँड ते पर्ल हॉटेल, फिजिओथेरपी सेंटर, निर्माण चौक ते जरगनगर शेवटचा स्टॉप, खरी कॉर्नर चौक ते गांधी मैदान, निवृत्ती चौक ते उभा मारुती चौक. महाभियानातर्गत या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शंभर कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यापैकी काही रस्त्यांचे काम अर्धवट आहे. झालेले रस्तेही टिकाऊ आणि दर्जेदार झाले नाहीत. परिणामी या रस्त्यांची शंभर दिवसातच दैना उडाली आहे.
रस्ते खराब होण्याची कारणे :
खराब जलनिस्सारण व्यवस्था : पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्यामुळे, गटारीचे किंवा अन्य पाणी रस्त्यावर साचणे, रस्त्याखालील पाईपलाईन फुटणे यामुळे रस्ता नरम होतो आणि खचतो. योग्य झडप किंवा गटार नसल्याने पाणी थेट रस्त्यावर राहते, त्यामुळे खड्डे तयार होतात.
खराब दर्जाचे काम : निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे (जसे की वाईट दर्ज्याचा डांबर, सिमेंट, वाळू). बांधकामाच्या वेळी योग्य प्रक्रिया न पाळणे. ठरलेल्या मानकांचे पालन न करणे.
वाहतुकीचा अति ताण : जास्त वजनदार वाहने (ट्रक्स, ट्रॅक्टर्स) सतत वापरल्यामुळे रस्ता लवकर खराब होतो. रस्त्याची क्षमता विचारात न घेता वाहतुकीचा भार वाढवला जातो.
—————————————————————————————–