कोल्हापुरात दहा-पंधरा दिवस दडी मारलेला पावसाने काल रात्री कोल्हापूरकरांना चांगलेच झोडपून काढले. रात्री नऊ वाजता सुरु झालेल्या पावसाने बघता बघता जोराचा वर्षाव सुरु केला. हा पाऊस मध्यरात्री दीड वाजेपर्यंत सुरु होता. मात्र आज सकाळी आकाश आणि रस्तेही लख्ख झाले होते. सकाळी सकाळी उनही पडले होते. मात्र आकाशात ढग भरलेले दिसत होते. दक्षिण कोकणापासून गोव्याच्या किनारपट्टीपर्यंच आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला असून कोल्हापुरातही दुपरी उन पडून हवा गरम होत असली तरी दुपारनंतर पाऊस झोडपण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या मुंबई शाखेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार ताशी ३० ते ४० किमीच्या वेगानं पुढील २४ तासांत वारे वाहणार असून, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची जोरदार हजेरी असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर, उत्तर कोकणातील काही जिल्ह्यांनाही पाऊस झोडपणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. दक्षिण कोकणापासून गोव्याच्या किनारपट्टीपर्यंच आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा असेल.
सध्या मराठवाड्यात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्यातून वाहणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे राज्याच्या विविध भागात पावसाची तीव्रता वाढली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, नाशिक, अहमदनगर, घाटमाथा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली, नागपूर, नंदुरबार आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
राज्यात एकिकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे ढगाळ वातावरण असं काहीसं चित्र असलं तरीही हा पाऊस इतक्यात काही पाठ सोडणार नाही, हेच चित्र स्पष्ट होत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला असला तरीही हा मोसमी पाऊस धुमाकूळ घालेल असेच वातावरण आहे. हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार १८ सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर महाराष्ट्रासह गुजरात आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पहिल्या आठवड्यात दक्षिण भारत, महाराष्ट्रासह गुजरातमध्ये सरासरीहून अधिक पावसाचा अंदाज आहे. त्यानंतरच्या आठवड्यात वायव्य, मध्य आणि पश्चिम भारतासह ईशान्य भारतात पावसाचा अंदाज आहे. यादरम्यान केरळ, कर्नाटकालाही पाऊस झोडपणार आहे. तर, तिसऱ्या आठवड्यामध्ये पूर्वोत्तर भारतासह उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये पाऊस धुमाकूळ घालताना दिसेल. असं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.
केंद्रीय हवामानशास्त्र विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार २२ सप्टेंबरनंतर सुरू होणाऱ्या आठवड्यामध्ये उत्तर पश्चिमेस आणि त्यानजीकच्या परिसरात कमी दाबाचं क्षेत्र नव्यानं तयार होण्याची शक्यता असल्यानं ओडिशा, मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान आणि महाराष्ट्राच्या काही भागांना पावसाचा मारा सहन करावा लागेल. यावेळी पावसाचा बहुतांश प्रभाव हा मराठवाडा आणि विदर्भ भागांवर दिसून येणार असल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.