प्रसारमाध्यम : वृत्तसेवा
इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याने झंझावाती शतकी खेळी करत भारतीय संघाला मजबूत स्थितीत नेलं आहे. यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार शुभमन गिलनंतर शतक झळकावणारा ऋषभ पंत आता भारताचा सर्वाधिक कसोटी शतके करणारा यष्टीरक्षक ठरला आहे. त्याने महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडत आपलं सातवं कसोटी शतक नोंदवलं.
पंतने केवळ १४६ चेंडूंमध्ये १० चौकार आणि ४ षटकारांसह दमदार शतक साजरं केलं. विशेष म्हणजे, तो ९९ वर असताना थेट षटकार ठोकून शतक गाठलं. कसोटी कारकिर्दीत तिसऱ्यांदा षटकार मारून शतक साजरं करण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला आहे.
शतक साजरं करताना ऋषभ पंतचं सेलीब्रेशन खास ठरलं. त्याने प्रथम बॅट उंचावत ड्रेसिंग रूमकडे पाहत अभिवादन केलं. भारतीय खेळाडूंनी टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं. आणि त्यानंतर पंतने बॅट जमिनीवर ठेवली, हँडग्लोव्ह्ज काढले आणि धावत जात हवेत उलटी उडी मारली! हेच सेलीब्रेशन त्याने याआधी IPL 2025 मध्ये RCB विरुद्ध ११८ धावांची खेळी केल्यानंतरही केलं होतं.
पंतच्या या विशेष शैलीला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. चाहते आणि माजी खेळाडू त्याच्या फॉर्म आणि आत्मविश्वासाचं तोंडभरून कौतुक करत आहेत.
दरम्यान, भारताने पहिल्या डावात ४०० धावांचा टप्पा पार केला असून पंतचा फॉर्म पाहता भारत ५०० पार जाईल, असा विश्वास टीम इंडियाला आहे. इंग्लंडसाठी ही खेळी मोठं आव्हान ठरू शकते.
ठळक मुद्दे :
-
ऋषभ पंतचं कसोटीतील ७ वं शतक
-
इंग्लंडमध्ये तिसरं कसोटी शतक
-
धोनीचा विक्रम मोडला
-
९९ वर षटकार मारून शतक
-
IPL सारखंच ‘हवेत उलटी उडी’ सेलिब्रेशन
-
सोशल मीडियावर तुफान चर्चेत
इंग्लंडविरुद्ध लीड्स येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात टीम इंडियाने ४७१ धावा केल्या आहेत. भारताकडून यशस्वी जैस्वाल (१०१), शुभमन गिल (१४७) आणि ऋषभ पंत (१३४) यांनी शानदार शतके झळकावली. दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. कर्णधार बेन स्टोक्स आणि जोश टँग यांनी सर्वाधिक ४-४ विकेट घेतले. दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजीवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले, कारण टीम इंडियाने शेवटचे ७ बळी अवघ्या ४१ धावांत गमावले.
—————————————————————————————–