प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
भारतीय वंशाच्या व्यावसायिक नेतृत्वाने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर आपली ताकद सिद्ध केली आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२५नुसार, अरिस्ता नेटवर्क्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जयश्री उल्लाल यांनी संपत्तीच्या बाबतीत ‘गूगल’चे सुंदर पिचाई आणि ‘मायक्रोसॉफ्ट’चे सत्य नाडेला यांना मागे टाकत भारतीय वंशाच्या सर्वांत श्रीमंत CEOचे स्थान पटकावले आहे.
हुरुन इंडियाच्या अहवालानुसार, जयश्री उल्लाल यांची एकूण संपत्ती ५०,१७० कोटी रुपये इतकी आहे. तुलनेने सत्य नाडेला यांची संपत्ती सुमारे ९,७७० कोटी रुपये, तर सुंदर पिचाई यांची संपत्ती ५,८१० कोटी रुपये इतकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या आकडेवारीमुळे जयश्री उल्लाल यांची जागतिक उद्योगविश्वात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.
६४ वर्षीय जयश्री उल्लाल गेली १७ वर्षे अरिस्ता नेटवर्क्स या क्लाउड नेटवर्किंग क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीचे नेतृत्व करत आहेत. डेटा सेंटर्स आणि क्लाउड सेवा पुरवठादारांसाठी सॉफ्टवेअर-आधारित नेटवर्किंग सोल्यूशन्स देणारी अरिस्ता कंपनी आज जागतिक पातळीवर महत्त्वाची मानली जाते. पारंपरिक नेटवर्किंगच्या चौकटीबाहेर जाऊन केलेल्या नवकल्पनांमुळे कंपनीने मोठी झेप घेतली आहे.
ब्रिटनमध्ये जन्मलेल्या जयश्री उल्लाल लहानपणी भारतात आल्या. नवी दिल्लीतील ‘कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी’ शाळेतून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को स्टेट युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी आणि सांता क्लारा विद्यापीठातून इंजिनिअरिंग मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या वडिलांचे भारतीय शिक्षणव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान होते.
अरिस्तामध्ये येण्यापूर्वी त्यांनी सिस्को, एएमडी आणि फेअरचाइल्ड सेमीकंडक्टर यांसारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये काम केले. २००८ मध्ये अवघ्या काही कर्मचाऱ्यांच्या स्टार्टअपमध्ये सामील होण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय आज इतिहास ठरला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अरिस्ता नेटवर्क्सने २०२४ मध्ये ७ अब्ज डॉलर्सचा महसूल नोंदवला असून, कंपनीत त्यांची सुमारे ३ टक्के भागीदारी आहे.
AI आणि क्लाउड तंत्रज्ञान क्षेत्रातील तेजीमुळे गेल्या काही वर्षांत त्यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. आज जयश्री उल्लाल या केवळ भारतीय वंशाच्या नव्हे, तर जगातील सर्वाधिक प्रभावी महिला CEOंपैकी एक म्हणून ओळखल्या जातात.





