कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कालपासून पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात चांगलीच उघडीप दिली आहे. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाल्याने नदीची पाणी पातळी स्थिर राहिली आहे. यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरीकांना दिलासा मिळाला आहे. हवामान विभागानं काल वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातून पाऊस मोठ्या सुट्टीवर जाण्याच्या तयारीत असल्याची चिन्हं होती. मात्र आता हाच पाऊस विदर्भ आणि नजीकच्या भागांसह कोकणातसुद्धा आणखी काही दिवस मुक्कामी असल्याचं स्पष्ट होत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्येसुद्धा पावसाची जोरदार हजेरी असेल असा प्राथमिक अंदाजवर्तविण्यात आला आहे.
रशियातील समुद्रात आज सकाळी झालेला मोठा भूकंप व बंगालच्या उपसागरात झालेला ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप यामुळेही हवामानात नेमके कोणते बदल होतील हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
काल मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये काही ठिकाणी पावसानं उसंत घेतली होती. मात्र दिवस मावळतीला गेल्यानंतर पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींनी शहराला ओलचिंब केलं. पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसासह आकाश सामान्यत: ढगाळ राहील असा अंदाज आहे.
अरबी समुद्रापासून थेट बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा आता सक्रिय असून, त्यामुळं कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह विदर्भावर पावसाचं सर्वाधिक सावट पाहायला मिळत आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात बुधवारी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, कोकणापासून गोव्यापर्यंत पावसाची अपेक्षित हजेरी पाहायला मिळेल, तर गुरुवारनंतर विदर्भात पावसाचा जोर कमी होणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
———————————————————————————-



