लातूर : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन पेटलेले असताना, या लढ्याला निर्णायक वळण देण्यासाठी मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी ‘ चलो मुंबई ’ ची हाक दिली आहे. ” सरकारने आरक्षण दिलं तर गुलाल लावून आभार मानू, पण कुणीही आडवं आलं तरी आम्ही मुंबईला जाणारच. माझा जीव गेला तरीही आझाद मैदानात बसून ही लढाई लढणार. यावेळी ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण घेऊनच परत येणार,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
लातूरमध्ये माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी सरकारवर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ” माणूस किती दलबदलू असावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे फडणवीस. त्यांना सत्तेवर ठेवायचं नसतं तर मराठ्यांनी त्यांना मुख्यमंत्री केलं असतं का ? ते धनगरांना जसं फसवलं, तसंच मराठ्यांना फसवत आहेत. मराठ्यांच्या मुलांना व्हॅलिडिटी देत नाहीत. त्यांनी काही लोक पाळले आहेत जे वेळ आली की मराठ्यांच्या विरोधात बोलतात,” असा आरोप जरांगेंनी केला.
तसेच, ” फडणवीस म्हणतात, पोलीस बघून घेतील. सत्ता असेल तर सगळं करता येईल या गैरसमजातून त्यांनी बाहेर यावं. एखाद्याला हात लावून दाखवा, मग सांगतो,” असा इशाराही त्यांनी दिला.
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जरांगेंची भेट घेऊन मराठा समाजाच्या मागण्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्याचे आश्वासन दिले.
मुंबईकडे जाणाऱ्या मार्गातही बदल करण्यात आल्याची माहिती जरांगेंनी दिली. ” यावेळी अंतरवालीतून पैठणमार्गे, नंतर शिवनेरीत मुक्काम, त्यानंतर चाकणमार्गे वाशी, आणि शेवटी आझाद मैदान” असा प्रवास असणार आहे. २९ ऑगस्टला मुंबईत होणारा हा मोर्चा राज्याच्या राजकीय तापमानात आणखी भर घालणार, यात शंका नाही.
—————————————————————————————
Be the first to write a review