Google search engine

प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर

भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा आत्मविश्वासपूर्ण रोडमॅप मांडत “महाराष्ट्र थांबणार नाही, तो सातत्याने प्रगतीकडे झेपावत राहील” असा ठाम विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्र हे केवळ एक राज्य नसून देशाच्या विकासाचे इंजिन असून आगामी काळात ते भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

ध्वजारोहणानंतर राज्यातील तसेच जगभरातील नागरिकांना शुभेच्छा देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “२६ जानेवारी १९५० रोजी आपण संविधान स्वीकारून लोकशाहीप्रधान प्रजासत्ताकाची पायाभरणी केली. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळेच आपली लोकशाही मजबूत आहे.”

महाराष्ट्राच्या विकासगंगेतील सर्व विभाग सहभागी

महाराष्ट्र ही संतांची व वीरांची भूमी असून आज राज्य देशाच्या विकासाचे इंजिन म्हणून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. नुकत्याच दावोस येथे महाराष्ट्रासाठी ३० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असून त्याचा लाभ राज्याच्या प्रत्येक भागाला मिळत आहे, असे त्यांनी नमूद केले.
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई – राज्यातील सर्व विभाग महाराष्ट्राच्या विकासगंगेचे भाग बनत असून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळमुक्त महाराष्ट्र आणि शेतकरी केंद्रस्थानी

“महाराष्ट्रातील शेतकरी सुखावला पाहिजे, हाच सरकारचा केंद्रबिंदू आहे,” असे सांगत फडणवीस म्हणाले की, शेतकरी अडचणीत असताना सरकारने वेळोवेळी भरघोस मदत केली आहे. आगामी काळात दुष्काळमुक्त महाराष्ट्राकडे वाटचाल करत नदीजोड प्रकल्प, जलसंधारण आणि सिंचन योजनांद्वारे शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.
समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग यांसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे राज्य विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत असल्याचे त्यांनी नमूद केले.

सामाजिक योजनांतून सर्वांगीण विकास

आदिवासी, अनुसूचित जाती-जमातींसाठी विशेष विकास योजना, पंतप्रधान आवास योजना, महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजना, शेतकऱ्यांसाठी कृषी उपक्रम आणि मोफत वीज योजनेसारख्या निर्णयांद्वारे समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

“महाराष्ट्र गतीशील राहील आणि संविधानाने दिलेल्या व्यवस्थेच्या बळावर सातत्याने प्रगती करत राहील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ठाण्याला नवी जागतिक ओळख – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “सामान्यांच्या राज्याचा” गौरव करत विकास हाच सरकारचा मुख्य अजेंडा असल्याचे सांगितले.
“मी सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नाही; पण महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस आणण्याचा प्रयत्न करतो,” असे ते म्हणाले.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना कायमस्वरूपी सुरू राहील, अशी ग्वाही देत त्यांनी झोपडपट्टीमुक्त शहरे, मेट्रोचे विस्तारित जाळे आणि ठाण्यात २६० मीटर उंचीचा जागतिक दर्जाचा व्ह्यूइंग टॉवर उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली. हा टॉवर ठाण्याची नवी जागतिक ओळख ठरेल, असे शिंदे यांनी नमूद केले.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here