राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केलेल्या “निवडणुकीपूर्वी दोन अज्ञात व्यक्तींनी १६० जागा मॅनेज करून देण्याची ऑफर दिली होती” या वक्तव्यावरून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांवर टीका करताना म्हटले, “ ही सलीम-जावेदची गोष्ट चालली आहे. तुम्ही जबाबदार नागरिक आहात, अशा प्रकारे कोणी आलं तर पोलिस किंवा निवडणूक आयोगाकडे तक्रार का केली नाही ? वापर करण्याचा प्रयत्न केला का ? अशा सलीम-जावेदच्या गोष्टी बंद केल्या पाहिजेत.”
राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनीही पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटले, “ पवारांना ज्या दोन व्यक्ती भेटल्या त्यांचं नाव-गाव त्यांना माहीत असेल. त्यांनी त्यांच्या कडून प्रयोग करून घ्यायला हवा होता. असं काही झालेलं नाही, पवार साहेब गुगली टाकत आहेत. कथो-कल्पित गोष्टी सांगून लोकांचं मनोरंजन होत आहे.” त्यांनी पुढे राहुल गांधींवर निशाणा साधत, “ मत चोरीची तक्रार ही फक्त बिहार निवडणुकीसाठीचा स्टंट आहे. कोल्हापुरातून एकही तक्रार आलेली नाही, पराभव पचवण्यासाठी ताकद लागते,” अशी टिप्पणी केली.
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, “ जर पवारांना अज्ञात लोक भेटले असतील तर त्यांनी राष्ट्रपतींकडे तक्रार केली पाहिजे.”
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पवारांच्या वक्तव्याला ‘वरातीमागून घोडं’ असे संबोधले. ते म्हणाले, “ याआधी आम्ही सर्व पक्षांना कोर्टात जाण्याचे आवाहन केले होते, पण कोणीही साथ दिली नाही. कोर्टच एकमेव ठिकाण आहे जिथे दूध का दूध आणि पाणी का पाणी होतं.”
या सर्व विधानांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून पुढील काही दिवस या वादाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.