कुरुंदवाड:प्रतिनिधी
धरणपाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे राधानगरी, कोयना, वारणा या प्रमुख धरणातून मंगळवारपासून विसर्ग कमी करण्यात आला आहे. यामुळे शिरोळ तालूक्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत आज दिवसभरात ३ इंचाने वाढ झाली आहे. परिणामी तालुक्यातील नदीकाठच्या नागरीकांना पुरापासून काही अंशी दिलासा मिळाला आहे.
जुलै अखेर व ऑगस्ट महिन्यापर्यंत शिरोळ तालुक्यात पूर हमखास येतो. हा गेल्या पाच- सहा वर्षापासूनचा अनुभव शिरोळ तालुक्यातील नागरीकांचा आहे. यामुळे जुलैमध्ये सुरु असणारा पाऊस व विविध धरणातून करण्यात येणारा विसर्ग प्रत्येक वर्षी ऑगस्टमध्ये शिरोळ तालूक्यात पुर घेऊनच येतो. यात अलमट्टीने वेळेवर विसर्ग वाढविला तर ठिक नाहीतर शिरोळ तालूक्यात पुराचे रुपांतर महापुरात होण्यास वेळ लागत नाही. अजुनही १५ ऑगस्टपर्यंत तालुक्यातील जनतेत पुराची भीती ही राहणारच आहे. आजरोजी तालुक्यातील सर्वच नद्या पात्राबाहेर वाहत आहेत.
दरम्यान सध्या धरणपाणलोट क्षेत्रात कमी झालेला पाऊस व विविध धरणातून कमी करण्यात आलेला विसर्ग यामुळे येथील नदीकाठच्या ग्रामस्थांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. मंगळवारी सांयकाळी चार वाजेपर्यंत राधानगरी धरणाचे सर्व स्वंयचलित दरवाजे बंद झाले आहेत. मात्र धरणाच्या विद्युत पायथागृहातुन १५०० क्युसेक विसर्ग नदी पात्रात करण्यात येत आहे. वारणा धरणातून मंगळवारी सकाळी ८ वाजता सुरु असलेला एकुण १४०७४ क्युसेक विसर्ग कमी करुन तो सांयकाळी १३,८६२ क्युसेक करण्यात आला आहे. कोयना धरणातून मात्र सुरु असलेला एकूण २१८२४ क्युसेक विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे.
मंगळवारी सकाळी सात वाजता नृसिंहवाडीजवळ कृष्णेची पाणी पातळी ५० फुट होती. ती सांयकाळी पाच वाजेपर्यंत ५० फुट ३ इंच झाली आहे. यावरुन दिवसभरात मात्र ३ इंचाने कृष्णेची पातळी वाढली आहे. तर राजापूर धरणाजवळ सकाळी आठ वाजता पाणीपातळी ३९ फुट ३ इंच होती, ती सांयकाळी पाच वाजता ३९ फुट ८ इंच झाली आहे. मंगळवारी सांयकाळी पाच वाजेपर्यंत राधानगरी धरणात ८.२९ टीएमसी, कोयना धरणात ८५.८१ टीएमसी, वारणा धरणात २९.०४८
तर अलमट्टी धरणात ९६.१६८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. दरम्यान राजापुर धरणावरुन पुढे कर्नाटकात हिप्परगी धरणाकडे १,४०,००० क्युसेक ने विसर्ग पुढे वाहत आहे. मंगळवारी दिवसभरात शिरोळ तालुक्यात अधुनमधून पावसाच्या हलक्या सरी झाल्या. मात्र पहाटेपासुन दिवसभर जोरदार वारे वाहत आहे.
शिरोळ तालूक्यातील सर्वच नद्या सध्या पात्राबाहेर वाहत आहेत. यामुळे नदीकाठावरील शेकडो एकर क्षेत्रातील गवतकुरणे पाण्याखाली गेली आहेत. गेल्या दोन दिवसात नद्यांचे पाणी सतत वाढत असल्यामुळे आज गवतकुरणातून पाणी वर सरकून ऊस पिकांच्या शेतीक्षेत्राजवळ पोहचले आहे. मात्र सध्या विविध धरणातून विसर्ग कमी केल्यामुळे पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता कमी वाटते. यामुळे पाण्यापासून पिकांचे नुकसान होणार नाही. मात्र पुन्हा पाऊस वाढला तर तालुक्यातील शेतीक्षेत्राचे चित्र वेगळे दिसू शकते.