गणेशोत्सव साजरा करताना एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार उद्याच होणार आहे. दर महिन्याला पगार उशिरा मिळण्याची सवय झालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या ( एसटी ) कर्मचाऱ्यांचा यंदाचा गणेशोत्सव आनंदात जाणार आहे.
गणेशोत्सव साजरा करताना कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला. सरकारी अधिकारी, कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना १ सप्टेंबर रोजी मिळणारे वेतन आणि निवृत्तीवेतन गणेशोत्सवाआधीच देण्याचे आदेश शासनाने जारी केले आहेत. गणेशोत्सवाची सुरुवात २७ ऑगस्ट पासून होत असल्याने हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरला आहे.
यासोबतच राज्य परिवहन महामंडळातील ( एसटी ) कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. साधारणपणे दर महिन्याला ७ ते १० तारखे दरम्यान वेतन मिळणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना यंदा मात्र पगार उद्याच ( २६ ऑगस्ट ) खात्यात जमा होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला होता. त्यांनी पगाराची फाईल वित्त मंत्रालयाकडे सादर करून लवकर निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर वित्त विभागाने पगार पाच दिवस आधी करण्यास मान्यता दिली.
गेल्या काही महिन्यांपासून पगार उशिरा मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. अनेकदा महिन्याच्या शेवटी किंवा पुढील महिन्यात वेतन मिळत असल्याने सणासुदीच्या खर्चात अडचणी निर्माण होत होत्या. मात्र, यंदा गणेशोत्सवा आधीच पगार मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा होणार आहे.