कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापुरात दोन दिवसात पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने विशेषत: सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्याना मोठा दिलासा मिळाला आहे. आज सकाळपासून पावसाचा ठिपुसही नाही. उलट उन पडले आहे. कोल्हापूरमध्ये आज दुपारी १ वाजेपर्यंत पावसाची अधिक शक्यता असून, भारतीय हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार भारतातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये पुढील ४८ तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हजेरी असेल. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा इथं पाऊस थैमान घालताना दिसेल. तर जम्मू काश्मीरमध्येसुद्धा पावसाचा तडाखा बसेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
फक्त देशाच्या उत्तरेकडेच नव्हे, तर बंगालच्या उपसागरामध्ये नव्यानं निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्याच पुन्हा एकदा पाऊस दुप्पट तीव्रतेनं सक्रिय झाला आहे. ज्यामुळं पुढील २४ तासांमध्ये उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार ४ ते ६ सप्टेंबर दरम्यान उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची गती वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. तर, राज्याच्या इतर भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ५ सप्टेंबरला, राज्यात पावसाचा जोर तुलनेनं अधिक असेल असंही हवामान विभागानं स्पष्ट केलं असून, राज्यात सणांचा काळ असल्यानं नागरिकांनाही यादरम्यान सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
————————————————————————————————–