अकरावीच्या नोंदणी शुल्कात कपात ; राज्यभरातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

0
332
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

राज्यभरातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होणार असून विद्यार्थ्यांना भराव्या लागणाऱ्या नोंदणी शुल्कात कपात करण्यात आली आहे. आता राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून शंभर रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

गेल्या वर्षीपर्यंत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांकडून आकारले जाणारे नोंदणी शुल्क मुंबईसाठी २२५ रुपये, तर उर्वरित विभागांसाठी १२५ रुपये शुल्क आकारण्यात येत होते. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशांसाठी शालेय शिक्षण विभागाने स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून १५ मे पर्यंत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी करण्यात येणार असून, १९ मे पासून विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

अकरावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होणार असून शिक्षण विभागाकडून – https:// mahafyjcadmissions. in हे अधिकृत संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. नवे संकेतस्थळ ९ मे पासून कार्यान्वित करण्यात आले आहे.

दहावीचा निकाल १५ मे पूर्वी जाहीर होणे अपेक्षित आहे, तर १९ ते २८ मे या कालावधीत विद्यार्थ्यांनी नोंदणी करणे अपेक्षित असून, प्राधान्यक्रमही नोंदवले जाणार आहेत.

अकरावीचे केंद्रीय ऑनलाइन प्रवेश १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून सुमारे १६ लाख ७६ हजार जागांसाठी प्रवेश प्रक्रिया होईल. कनिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग ११ ऑगस्ट पासून सुरू केले जाणार आहेत. केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील जवळपास ११ हजार ७०० कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या सुमारे १६ लाख ७६ हजार जागा उपलब्ध होणार असून, या माध्यमातून अकरावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रवेशावर लक्ष राहणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) जून-जुलैमध्ये १२ वी ची पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, ७ ते १६ मे या कालावधीत नियमित शुल्कासह, तर १८ ते २२ मे या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत.

—————————————————————————————————-

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here