मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यातील लाखो तरुणांना अपेक्षित असलेली पोलिस भरती आता प्रत्यक्षात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १२ ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार गृह विभागाने १५,६३१ पदांची भरती करण्यास मान्यता देणारा शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
कोणत्या जागा रिक्त ?
शासन निर्णयानुसार, महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दि. १ जानेवारी २०२४ ते दि. ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत रिक्त झालेली तसेच दि. १ जानेवारी २०२५ ते दि. ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत रिक्त होणारी पदे भरण्यात येणार आहेत.
| पदनाम | पदसंख्या |
|---|---|
| पोलीस शिपाई | १२,३९९ |
| पोलीस शिपाई चालक | २३४ |
| बॅण्डस्मन | २५ |
| सशस्त्र पोलीस शिपाई | २,३९३ |
| कारागृह शिपाई | ५८० |
| एकूण | १५,६३१ |
भरती प्रक्रियेतील सवलती
-
वयोमर्यादा शिथिलता : २०२२ व २०२३ मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष संधी देण्यात आली आहे.
-
परीक्षा पद्धत : भरती प्रक्रिया घटकस्तरावरून राबविण्यात येणार असून OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहे.
-
परीक्षा शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹ ४५० तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹ ३५० शुल्क निश्चित करण्यात आले आहे. परीक्षा शुल्कातून जमा झालेली रक्कम ही भरती प्रक्रियेच्या खर्चासाठी वापरण्यात येणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या दि. ४ मे २०२२ व २१ नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयातील काही तरतुदींमधून शिथिलता देत गृह विभागाने हा नवा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या भरतीप्रमाणेच पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबवली जाईल, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात दरवर्षी लाखो तरुण पोलिस भरतीसाठी तयारी करतात. २०२४ आणि २०२५ मधील एकत्रित रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतल्याने रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. शासन निर्णय जारी झाल्यामुळे भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला असून येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष जाहिरात प्रसिद्ध होऊन अर्जप्रक्रिया सुरू होणार आहे.
——————————————————————————————–



