GST is playing a major role in the country's revenue collection, and a positive picture has been seen in August 2025 as well.
नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
देशाच्या महसूल संकलनात जीएसटी मोठी भूमिका बजावत असून, ऑगस्ट – २०२५ मध्येही सकारात्मक चित्र दिसून आले आहे. या महिन्यातील जीएसटी संकलनाचा आकडा १.८६ लाख कोटी रुपयांवर पोहोचला. हा आकडा गेल्या वर्षी ऑगस्ट-२०२४ मधील १.७५ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत ६.५ टक्क्यांनी जास्त आहे. मात्र, जुलै-२०२५ मध्ये १.९६ लाख कोटी रुपयांचे संकलन झाले होते, त्यामुळे ऑगस्टमध्ये थोडीशी घट नोंदवली गेली.
एप्रिलमध्ये ऐतिहासिक विक्रम
या वर्षी एप्रिल-२०२५ मध्ये सरकारने महसूल संकलनाचा इतिहासातील सर्वोच्च विक्रम केला. त्या महिन्यात जीएसटीतून तब्बल २.३७ लाख कोटी रुपये मिळाले. हे आतापर्यंतचे सर्वात मोठे मासिक संकलन मानले जाते.
देशांतर्गत महसूलातही वाढ
ऑगस्ट महिन्यात केवळ जीएसटी नव्हे, तर एकूण देशांतर्गत महसूलातही वाढ झाली. ऑगस्ट २०२५ मध्ये सकल देशांतर्गत महसूल १.३६ लाख कोटी रुपये नोंदवला गेला, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत ६.६ टक्के जास्त आहे. मात्र, आयात करात थोडीशी घट झाली असून तो १.२ टक्क्यांनी कमी होऊन ४९.३५४ कोटी रुपयांवर आला आहे.
पुढील पिढीतील सुधारणा लवकरच
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी मोठी घोषणा केली होती. दिवाळी पर्यंत जीएसटी मधील पुढील पिढीतील सुधारणा जनतेसमोर आणल्या जातील. या सुधारणांमुळे सामान्य करदात्यांना अधिक सवलती मिळतील, तर लहान व मध्यम उद्योगांना मोठा फायदा होईल. ” जीएसटीने अंमलबजावणीची आठ वर्षे पूर्ण केली आहेत. आता ती आणखी सोपी, पारदर्शक आणि प्रभावी करण्याची वेळ आली आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.
लक्षणीय बाब म्हणजे अनेक विरोधी शासित राज्ये देखील या सुधारणा प्रक्रियेच्या बाजूने आहेत. राज्यांचा आग्रह आहे की जीएसटी दर अधिक तर्कसंगत ठेवले जावेत, ज्यामुळे व्यापारी आणि सामान्य जनतेला थेट लाभ होईल. त्याचबरोबर, नफेखोरीवर कठोर नियंत्रण ठेवण्याची मागणीही राज्यांकडून होत आहे, जेणेकरून केवळ काही मोजक्या घटकांनाच जास्त फायदा होऊ नये.