Many devotees walk barefoot for nine days, a tradition that is said to have religious, cultural, and health-related reasons.
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
देशभरात नवरात्रोत्सवाची उत्साही धामधूम सुरू असताना भक्त नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची उपासना करतात. या काळात उपवास, व्रत आणि विविध पारंपरिक नियम पाळले जातात. त्यापैकी एक महत्त्वाची प्रथा म्हणजे संपूर्ण नवरात्रीत अनवाणी राहणे. अनेक भक्त नऊ दिवस पायात चप्पल न घालता चालतात. या परंपरेमागे धार्मिक, सांस्कृतिक आणि आरोग्यदायी अशी अनेक कारणे सांगितली जातात.
धार्मिक कारणे
पूर्वीच्या काळी चप्पल तयार करण्यासाठी रबर, फायबर किंवा प्लास्टिकचा वापर नव्हता. चामड्याच्याच चपला बनवल्या जात. चामडे मिळवण्यासाठी प्राण्यांचा बळी दिला जाई. त्यामुळे नवरात्रासारख्या पवित्र काळात चामडे परिधान करणे अपवित्र मानले जाई. देवीची पूजा करताना जीवहिंसक वस्त्र किंवा पादत्राणे न वापरण्याची हीच परंपरा आजही अनवाणी राहण्याच्या स्वरूपात पाळली जाते.
परंपरागत कारणे
पूर्वी देवींची मंदिरे उंच टेकड्यांवर किंवा जंगलामध्ये असायची. त्या काळात डांबरी रस्ते नव्हते. पावसाळ्याच्या दिवसांत ओलसर पायवाटांवर चप्पल घालून जाणे अवघड असे. त्यामुळे लोक नैसर्गिकरित्या अनवाणी देवदर्शनास जायचे. हीच प्रथा हळूहळू धार्मिक परंपरेत रूपांतरित झाली.
आरोग्यदायी फायदे
अनवाणी चालण्यामागे आरोग्याचेही शास्त्र दडले आहे. नवरात्राच्या दिवसांत पृथ्वी उबदार राहते. पायांद्वारे जमिनीची नैसर्गिक उष्णता शरीरात शोषली जाते, ज्यामुळे शरीरातील उर्जा संतुलित राहते. तसेच जमिनीच्या थेट स्पर्शाने पायांवरील अॅक्युप्रेशर पॉइंट्स सक्रिय होतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारते, ताण कमी होतो आणि शरीर निरोगी राहते.
नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना आणि आत्मशुद्धीचा संकल्प. या काळात अनवाणी राहून भक्त देवीप्रती नम्रता आणि शुद्धतेचा संदेश जपतात. श्रद्धा, परंपरा आणि आरोग्य यांचा अनोखा संगम असलेली ही प्रथा आजही भक्तिभावाने पाळली जाते.