मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
जनधन योजनेला यंदा दहा वर्षे पूर्ण होत असल्याने देशभरातील ५५ कोटी जनधन खातेधारकांसाठी री-केवायसी (Re-KYC) अनिवार्य करण्यात आले आहे. खाते सक्रिय ठेवण्यासाठी ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी सरकार कडून प्रत्येक ग्रामपंचायतीत विशेष शिबिरे आयोजित केली जात आहेत.
शिबिरांमध्ये सोपी प्रक्रिया
या शिबिरांमध्ये खातेदारांनी आधार कार्ड आणि पत्त्याचा पुरावा सोबत नेऊन केवायसी फॉर्म भरावा लागेल. री-केवायसी म्हणजे ‘नो युअर कस्टमर’ची माहिती अपडेट करणे. यात तुमचा नवीन पत्ता, मोबाईल नंबर किंवा इतर महत्त्वाची माहिती बँकेला देणे आवश्यक आहे. ही माहिती आधीच्या रेकॉर्डपेक्षा वेगळी असू शकते.
बँक या प्रक्रियेद्वारे खात्याचे योग्य व्यक्तीच्या नावावर असणे आणि गैरवापर टाळणे याची खात्री करते.
खाते गोठवण्याचा धोका
आरबीआय गव्हर्नरांच्या निर्देशानुसार, ठरलेल्या मुदतीत री-केवायसी न केल्यास खाते गोठवले जाऊ शकते. यामुळे पैसे काढणे, जमा करणे, सरकारी सबसिडी मिळवणे किंवा लाभ हस्तांतरण (DBT) यावर बंदी येऊ शकते.
री-केवायसीचे फायदे
केवायसी पूर्ण केल्यास खातेदारांना खालील प्रमुख सरकारी योजनांचा लाभ घेता येईल
-
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) – वार्षिक फक्त ३३० रुपयांत २ लाख रुपयांचा जीवन विमा
-
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) – वार्षिक फक्त १२ रुपयांत २ लाख रुपयांचा अपघात विमा
-
अटल पेन्शन योजना (APY) – वृद्धापकाळासाठी मासिक १,००० ते ५,००० रुपयांपर्यंत पेन्शन सुविधा
जनधन योजनेचे इतर लाभ
-
किमान शिल्लक नसलेले खाते
-
जमा रकमेवर व्याजाची सुविधा
-
रुपे डेबिट कार्डसह १ ते २ लाख रुपयांपर्यंत अपघात विमा
-
पात्र खातेदारांना १०,००० रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा
-
सरकारी अनुदान थेट खात्यात (DBT) जमा होण्याची सोय