कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या तब्बल ३५६ शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्यात येणार आहे. दिव्यांग व गंभीर आजाराचे कारण दाखवून ‘ संवर्ग एक ’ चा लाभ घेतल्याच्या तक्रारींवरून जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
संवर्ग एक आणि तक्रारी
राज्य शासनाच्या ऑनलाईन बदली धोरणात ‘संवर्ग एक’ अंतर्गत १२ कारणांवर बदली करता येते. यामध्ये शारीरिक व्याधीग्रस्त आणि दिव्यांग शिक्षकांसाठी विशेष तरतूद आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांच्या आधारे सोयीची बदली करून घेतल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर झाल्या. यामुळे संपूर्ण बदली प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
महत्त्वाचे मुद्दे
-
जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील ३५६ शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची फेरतपासणी
-
‘संवर्ग एक’चा लाभ घेण्यासाठी खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याच्या तक्रारी
-
तपासणीची जबाबदारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे
-
अहवालानंतर अपात्र शिक्षकांवर होणार कठोर कारवाई
प्रशासनाचा कठोर निर्णय
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी सर्व ३५६ शिक्षकांची वैद्यकीय प्रमाणपत्रे फेर तपासणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना सखोल तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या अहवालानंतरच संबंधित शिक्षक लाभासाठी खरोखर पात्र आहेत की नाहीत हे स्पष्ट होणार आहे. जर अपात्र शिक्षक आढळले, तर त्यांच्यावर शासकीय नियमांनुसार कठोर शिस्तभंगात्मक कारवाई होणार आहे.
अशी आहे तालुकानिहाय यादी- आजरा – २०, भुदरगड – २३, चंदगड – १२, गडहिंग्लज – २५, गगनबावडा – ७, हातकणंगले – ४०, कागल – २४, करवीर – ६१, पन्हाळा – २४, राधानगरी – ३९, शाहूवाडी – २०,. शिरोळ – ६१
——————————————————————————————————————