प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर l
‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी रश्मिका मंदाना आणि लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा यांचा बहुचर्चित विवाह अखेर राजस्थानमधील ITC Mementos Udaipur येथे शाही थाटात पार पडला आहे.


गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती, माध्यमांतील वृत्तांनुसार दोघांनी पारंपरिक तेलुगू रितीरिवाजांनुसार सकाळी १०.१० वाजता विवाहबंधनात अडकत नव्या आयुष्याची सुरुवात केली, वरमाला समारंभादरम्यान दोघेही भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
लग्नाआधी २४ फेब्रुवारी रोजी संगीत आणि हळद अशा प्री-वेडिंग समारंभांचे आयोजन करण्यात आले होते, संगीत सोहळ्यात दोघांनीही मंचावर धमाकेदार नृत्य सादर केले, विशेषतः रश्मिकाने Pushpa 2: The Rule मधील ‘अंगारो’ गाण्यावर केलेल्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधले, त्यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या खास सोहळ्याला अत्यंत मर्यादित पाहुण्यांची उपस्थिती होती, जवळचे मित्र, कुटुंबीय आणि काही निवडक मान्यवर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला, दिग्दर्शक Sandeep Reddy Vanga आणि Tharun Bhascker यांनी उपस्थित राहून नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या, तसेच सेलिब्रिटी फोटोग्राफर Viral Bhayani यांनी लग्नासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
उदयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणाऱ्या सेलिब्रिटी जोड्यांच्या यादीत रश्मिका-विजय यांची भर पडली आहे, यापूर्वी Katrina Kaif–Vicky Kaushal तसेच Kiara Advani–Sidharth Malhotra यांनीही राजस्थानमध्ये लग्न केले होते, काही वर्षे आपले नाते खासगी ठेवलेल्या या जोडीने लग्नापूर्वी ‘विरोश’ हा हॅशटॅग शेअर करत चाहत्यांना संकेत दिला होता.
उदयपूरमधील विवाह सोहळ्यानंतर ४ मार्च रोजी हैदराबादमध्ये भव्य रिसेप्शनचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे, विजयच्या आईने रश्मिकाला पारंपरिक बांगड्यांची भेट दिल्याचीही चर्चा रंगली आहे, आता या शाही लग्नाचे अधिकृत फोटो पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.






