न्यूयॉर्क : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
न्यूयॉर्कच्या Madison Avenue वर रविवार, १७ ऑगस्ट २०२५ रोजी जगातील सर्वात मोठा व भव्य India Day Parade जल्लोषात साजरा होणार आहे. फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्स (FIA) तर्फे आयोजित या ४३ व्या परेड मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय कलाकार रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांना Grand Marshals म्हणून विशेष मान देण्यात आला आहे.
या वर्षीचा थीम “ सर्वे भवंतु सुखिन : जागतिक कल्याणासाठी जागतिक पुढाकार ” भारतीय संस्कृतीतील सर्वसमावेशकतेचा आणि जागतिक शांततेचा संदेश देणार आहे.
या महोत्सवाची सुरुवात १५ ऑगस्ट रोजी पारंपरिक ध्वजारोहणाने होणार असून Empire State Building या प्रसिद्ध इमारतीवर भारतीय तिरंग्याच्या रोषणाईने उत्सवाचे औपचारिक उद्घाटन होईल. १६ ऑगस्ट रोजी Times Square येथे पारंपरिक ध्वजवंदन व स्वातंत्र्यदिनाचा सोहळा पार पडेल.
मुख्य परेड १७ ऑगस्ट रोजी Madison Avenue वर रंगणार असून, यात रंगीबेरंगी floats, परंपरागत संगीत, नृत्य, भव्य रथयात्रा आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणे यांचा समावेश असेल. सोहळ्याचा समारोप Cipriani Wall Street येथील भव्य Grand Gala ने होणार आहे.
२७ जून रोजी न्यूयॉर्क येथील भारताच्या कन्सुलेट जनरल कार्यालयात पार पडलेल्या उद्घाटन समारंभात FIA ने याबाबत घोषणा केली होती. या वेळी रश्मिका आणि विजय यांनी सहा भाषांमध्ये हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि इंग्रजी एकत्रित व्हिडिओ संदेश देत कृतज्ञता व्यक्त केली आणि या ऐतिहासिक परेडमध्ये सहभागी होण्याची उत्सुकता दर्शवली.
दरवर्षी हजारो भारतीय व भारतीय वंशाचे नागरिक सहभागी होणारा India Day Parade हा भारताबाहेर साजरा होणारा सर्वात मोठा स्वातंत्र्यदिन सोहळा मानला जातो. यंदा रश्मिका आणि विजय यांच्या उपस्थितीमुळे या सांस्कृतिक जल्लोषाला अधिकच आकर्षण लाभणार आहे.
————————————————————————————-