कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच अत्यंत दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या राखाडी डोके असलेल्या टिटवी पक्षाचे दर्शन मसाई पठारावर घडले आहे. इचलकरंजीतील हौशी पक्षी निरीक्षक व वाईट लाइफ फोटोग्राफर श्री. जगताप, सचिन कवडे आणि रवी वळकुंडे यांनी सातेरी पठारावरील तलावावर फोटोग्राफी करत असताना या पक्षाचे दर्शन घडले. याची अभ्यासकांना या निरीक्षणाची माहिती दिल्यानंतर त्यांनी या पक्षाची दुर्मिळता अधोरेखित केली.
भारतातही यापूर्वी अमरावती व वर्धा (विदर्भ) येथे यांची नोंद झाली आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच या पक्षाचे दर्शन झाले आहे. हे पक्षी मुख्यत: पूर्वोत्तर जपानमध्ये वास्तविक करत असून दरवर्षी हिवाळ्यात बांग्लादेश, मलेशिया, फिलिपिन्स आणि अन्य पूर्व आशियाई देशांमध्ये स्थलांतर करतात.
व्हेनेलस सिनेरिअस हे या पक्षाचे शास्त्रीय नाव असून तो आकारांनी सामान्य टिटवी सारखा असतो. मानेपासून डोक्यापर्यंत त्याचा रंग राखाडी, चोच व पाय पिवळसर तर चोचीचे टोक काळे असते. छातीवर काळ्या रंगाचा कॉलर सदृश्य पट्टया याची खास ओळख देतो.
याचे वास्तव्य ओल्या गवताळ भागात असते. तसेच उथळ पाण्यातील कीटक कृमी याचे प्रमुख खाद्य आहे. मसाई पठार स्थलांतरित पक्षांसाठी महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. या भागात यापूर्वीही अनेक दुर्मिळ पक्षांच्या प्रजातींची नोंद झाली आहे. त्यामुळे पर्यावरण अभ्यासक आणि पक्षी निरीक्षकांचा ओढा सातत्याने या भागाकडे राहिलेला आहे. त्या नोंदीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जैवविविधतेच्या अभ्यासाला नवे परिमाण मिळाले आहे. मसाई पठारासारख्या निसर्ग संपन्न ठिकाणी होत असलेल्या दुर्मिळ नोंदीमुळे हा परिसर पक्षी निरीक्षण व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा ठरला आहे.
——————————————————————————————–





