राखी पौर्णिमा ; बाजारपेठा फुलल्या

धार्मिक महत्त्वही अनन्यसाधारण

0
174
Google search engine
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
भावाबहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेली राखी पौर्णिमा ( रक्षाबंधन ) निमित्त शहरातील बाजारपेठा रंगीबेरंगी राख्यांनी फुलल्या आहेत. ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या सणानिमित्त पारंपरिक ते ट्रेंडी अशा सर्व प्रकारच्या राख्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.
बाजार गेट, राजारामपुरी, महाद्वार रोड सह विविध भागांमध्ये बहिणींची खरेदीसाठी गर्दी होत आहे. किरकोळ विक्रेत्यांनी खास स्टॉल्स लावले असून, सोनेरी-चंदेरी आवरण असलेल्या, ‘ॐ’, ‘जय श्रीराम’, त्रिशूळ, डमरू अशा धार्मिक नक्षीच्या राख्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी ‘इव्हिल आय’ डिझाइनच्या राख्यांनाही चांगली मागणी आहे. लहान मुलांसाठी कार्टून राख्या यंदाही हिट ठरत असून, काही विक्रेत्यांनी राखी खरेदीसोबत भेटवस्तूंच्या ऑफर्स दिल्या आहेत.
या सणाचे धार्मिक महत्त्व देखील विशेष आहे. श्रावण पौर्णिमेस ‘श्रावणी’ असेही म्हणतात. पावसाळ्यानंतर लोक समाधानाने वेद-पुराणातील कथा ऐकत आणि कुमार मुलांना शिक्षण प्रारंभ करण्याचा हा शुभमुहूर्त मानला जाई. अध्ययनाचा प्रारंभ आणि शौर्याचे स्मरण या दोन गोष्टी श्रावणीमध्ये महत्त्वाच्या मानल्या जातात. श्रवण नक्षत्रावर हा उत्सव साजरा होतो.
पौराणिक कथेनुसार, महाभारतात पांडवांची पत्नी द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाच्या जखमी मनगटावर साडीचा कोपरा फाडून बांधला. त्या बदल्यात श्रीकृष्णाने तिचे रक्षण करण्याचे वचन दिले. या घटनेतून राखीच्या नात्याचा उगम मानला जातो. कालांतराने हा सण राजपूत समाजात ऐक्य व संरक्षणाचे प्रतिक म्हणून रूढ झाला. आज मात्र, हा दिवस सख्ख्या बहिणींसोबतच बंधुत्वाच्या नात्यातील इतर व्यक्तींनाही राखी बांधण्याचा, प्रेम व जिव्हाळा जपण्याचा सण म्हणून साजरा होतो.

पारंपरिकतेची ओळख आणि आधुनिकतेची झलक असलेल्या या सणाच्या तयारीने कोल्हापूरच्या बाजारपेठा उजळून निघाल्या आहेत.

———————————————————————————————–
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here