कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर ५०० एकर जमीन बाळगल्याचा आरोप केला होता. याला प्रत्युत्तर देताना राजू शेट्टी यांनी थेट बक्षिसपत्र तयार करून ती सर्व जमीन क्षीरसागर यांच्या नावावर करण्याचे खुले आवाहन करत बिंदू चौकात भर पावसात दोन तास ठिय्या आंदोलन केलं.
माझ्या सारखे निवडणुका लोकवर्गणीतून लढवणारे कमीच
माजी खासदार राजू शेट्टी – मी आजवर पाच निवडणुका लढवल्या, त्या सर्व लोकवर्गणीतून. मला राज्यभर फिरण्यासाठी जी फॉर्च्युनर मिळाली, ती देखील लोकांनी दिली. मी कधी कोणत्याही कंपनीकडे, बिल्डरकडे, डॉक्टरकडे, उद्योजकांकडे हप्त्यासाठी हात पसरले नाहीत. महापालिकेतील मोक्याच्या जागेवर आरक्षण टाकून जमिनी बळकावल्या नाहीत. त्यामुळे क्षीरसागर यांनी माझी चौकशी करावी, अशी माझी इच्छा आहे.
हजारो कार्यकर्त्यांचा बिंदू चौकात जनस्फोट
राजू शेट्टी यांनी “ मी दुपारी बारा वाजता बिंदू चौकात असेन ” असे सांगितल्यानंतर ११.४५ वाजताच शेट्टी बिंदू चौकात दाखल झाले. काही वेळातच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते जमू लागले आणि १२.३० पर्यंत हजारो कार्यकर्त्यांनी चौक व्यापून टाकला.
शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आणि आमदार क्षीरसागर यांच्या टीकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत बिंदू चौक अक्षरशः दणाणून सोडला.
बक्षिसपत्रावर कार्यकर्त्यांच्या साक्षीने सह्या
शेट्टी यांनी सार्वजनिकरित्या बक्षिसपत्र वाचून दाखवलं आणि कार्यकर्त्यांच्या साक्षीने त्यावर सह्याही केल्या. “रात्री अपरात्री कधीही या आणि हे बक्षिसपत्र घेऊन जा,” असा थेट टोला त्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना लगावला.
उपस्थित मान्यवरांची उपस्थिती
शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार, रविकिरण इंगवले, कॉम्रेड सम्राट मोरे, सुनील मोदी, सचिन चव्हाण, धनाजी पाटील, राजाराम देसाई, सचिन शिंदे, जयकुमार कोले, पोपट मोरे, संदीप राजोबा यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पोलिस बंदोबस्तात आंदोलन
स्वाभिमानी संघटनेच्या आंदोलनाचा अंदाज घेत पोलिस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ही लढाई केवळ जमिनीची नाही, तर राजकीय सच्चाईची आहे, असा निर्धार शेट्टी यांच्या प्रत्येक शब्दातून उमटत होता. आता आमदार क्षीरसागर यांची प्रतिक्रिया काय येते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
———————————————————————————————



