
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने यंदाचा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री डॉ. जब्बार पटेल यांना खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते.

पद्मश्री डॉ.जब्बार पटेल – लोकांच्या भावना समजून घेऊन काम करणाऱ्या शाहू महाराजांनी समाजात समतेचा विचार रुजवला. लोकशाही नसतानाही मानवी व सामाजिक मूल्य जपणारा राजा कोल्हापूरने दिला. तळागाळातील माणसांशी सत्तेच्या माध्यमातून जोडण्याचा राजमार्ग त्यांनी स्वकर्तृत्वातून निर्माण केला. शाहू महाराजांच्या विचारमूल्य महाराष्ट्राने जपले आहे. शाहू महाराजांनी आरक्षणाचा कायदा केला. परदेशातील शिक्षणाचा उपयोग त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी केला. पाश्चात्त आणि भारतीय संस्कृतीचा संगम त्यांच्या राज्य कारभारात, त्यांच्या कार्यात दिसून येतो. राज्य करण्यासाठी सर्वप्रथम माणुसकी कळली पाहिजे, कोणत्याही विषयाची फाईल मंजूर करताना मानवी चेहरा डोळ्यासमोर आला पाहिजे, हे विचार शाहू महाराजांनी दिले. आरोग्य सेवा, कुष्ठरोग, क्षयरोग निर्मूलन, बालविवाह बंदी, स्त्रियांना हक्क, आंतरजातीय विवाह, फासेपारधींना रोजगार, कला, क्रीडा, संगीत, शिक्षण अशी अनेक कॅबिनेट खाती एकटे शाहू महाराज लिलया हाताळत होते. आपल्या कार्यकर्तृत्वातून रयतेला न्याय देणारे शाहू महाराज हे केवळ कोल्हापूरचे नव्हे तर देशाचे राजे होते, अशा शब्दांत त्यांनी शाहू महाराजांप्रतिच्या भावना विशद केल्या. सिनेमाचे स्कूल असणाऱ्या कोल्हापूरशी माझे भावनिक नाते आहे. माझा पहिला सिनेमा कोल्हापुरात तयार झाला. कोल्हापूरच्या व्यक्तींनी मला भरभरुन प्रेम दिलं. ते आजही स्मरणात असल्याच्या आठवणी डॉ. पटेल यांनी यावेळी जागवल्या.
शाहू स्मारकाच्या नूतनीकरणासाठी पाच कोटींचा निधी देणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

देशाने आदर्श घ्यावा, असे उत्तुंग कार्य शाहू महाराजांनी केले आहे. शाहू महाराज प्रत्येकाच्या मनात आणि हृदयात आहेत. शाहू महाराजांचे विचार आणि त्यांचे कार्य सर्वदूर पोहोचवण्याच्या दृष्टीने शाहू स्मारकाच्या नूतनीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पाच कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली. डॉ. जब्बार पटेल यांनी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रासाठी बहुमोल योगदान दिले आहे. तमाशाच्या चित्रपटांमध्ये अडकलेल्या मराठी चित्रपट सृष्टीला नवा आयाम देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. पुढच्या पिढीला त्यांनी आपल्या अनुभवाचा वारसा कोल्हापूर मधून देण्याचे काम करावे. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे क्षेत्र नसून भविष्यात असे जब्बार पटेल घडावेत, अशी अपेक्षा पालकमंत्री श्री.आबिटकर यांनी व्यक्त केली.

खासदार शाहू महाराज छत्रपती – राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिले आहे. शाहू महाराजांनी दिलेला समतेचा विचार डॉ. जब्बार पटेल यांनी चित्रपटांच्या माध्यमातून रुजवला. कलेच्या माध्यमातून राज्याला नवी दिशा देण्याचे काम डॉ. जब्बार पटेल यांनी केले आहे.
डॉ. अशोक चौसाळकर – डॉ.जब्बार पटेल यांनी मराठी चित्रपट सृष्टीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सामना, जैत रे जैत, सिंहासन, उंबरठा, एक होता विदूषक यासारख्या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी सत्ता संघर्ष, गिरणी कामगारांचे जीवन, स्त्री स्वातंत्र्य, नियती आणि माणसाची बुद्धिमत्ता यांचा संभ्रम आदी विषयांवर हुबेहूब चित्रण केले आहे. त्याचबरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्व.यशवंतराव चव्हाण, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री चिपळूणकर यांचे चरित्रपट निर्माण करुन सामाजिक आणि कलाविषयक उत्तुंग कार्य त्यांनी केले आहे.
शाहू स्मारकाच्या नूतनीकरणासाठी शाहू प्रेमींनी योगदान द्यावे -जिल्हाधिकारी अमोल येडगे
ज्येष्ठ नाट्य व चित्रपट समीक्षक डॉ. जब्बार पटेल यांनी कलेसह विविध क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असून त्यांच्या कार्यातून तरुणांना प्रेरणा मिळेल, असे सांगून जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, भारतीय संविधानामध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची मूलतत्वे असून शाहू महाराजांच्या विचारांवरच प्रशासनाचे काम सुरु आहे. शाहू महाराजांच्या कार्याचा प्रसार करण्याचे काम शाहू स्मारक ट्रस्ट करत आहे.शाहू स्मारकाच्या नूतनीकरणासाठी शाहू प्रेमींनी योगदान द्यावे.
उपस्थिती- जिल्हाधिकारी तथा ट्रस्टचे अध्यक्ष अमोल येडगे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी तथा ट्रस्टच्या सदस्य सचिव मोहिनी चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, राजदीप सुर्वे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———————————————————————————————–





