मुंबई : प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्र आणि हिंदी सक्तीच्या निर्णयाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. सरकारच्या या निर्णया विरोधात येत्या ५ जुलै रोजी मुंबईत भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
“पक्षभेद विसरून सर्व मराठी बांधवांनी या महामोर्चात सहभागी व्हावं,” असे आवाहन करताना राज ठाकरे यांनी त्रिभाषा सूत्राला महाराष्ट्राच्या अस्मितेवर झालेला घाला असल्याचे ठामपणे म्हटले. “मराठी भाषा, संस्कृती आणि ओळख पुसण्याचा हा मोठा कट आहे. आम्ही हा कट यशस्वी होऊ देणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
आज राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्रिभाषा सूत्राची माहिती दिली. सरकारच्या या निर्णयामागील भूमिका समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज ठाकरे यांनी सरकारच्या सर्व सूचना आणि घोषणा फेटाळून लावत स्पष्ट शब्दांत विरोध नोंदवला.
“हिंदी भाषेला आमचा विरोध नाही, पण हिंदीची सक्ती आम्ही कदापि मान्य करणार नाही,” असे ठामपणे सांगत राज ठाकरे यांनी दादा भुसे यांना शब्दांतच उत्तर दिलं. परिणामी, शिक्षणमंत्र्यांना काही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ते खाली हात परतावे लागले.
त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “महाराष्ट्राच्या मातृभाषेला डावलून हिंदी सक्ती थोपवण्याचा प्रयत्न होत आहे. हे आम्हाला चालणार नाही. मराठी माणसाने आता जागं व्हावं लागेल,” असं आवाहन त्यांनी केलं.
येत्या ५ जुलै रोजी होणाऱ्या महामोर्चात मोठ्या संख्येने मराठी बांधवांनी उपस्थित राहून आपला विरोध व्यक्त करावा, असं आवाहन करत त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला.
महत्त्वाचे मुद्दे :
-
५ जुलै रोजी मुंबईत महामोर्चा
-
त्रिभाषा सूत्राविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा
-
हिंदी सक्ती नाकारण्याची भूमिका
-
पक्षभेद विसरून मराठी माणसाला एकत्र येण्याचे आवाहन
-
शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट निष्फळ
मनसेचा उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव
मनसेने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षालाही मोर्चात सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला आहे. वेगवेगळे मोर्चे निघायला नको. एकच मोर्चा हवा, अशी भूमिका मनसेनं घेतल्याचं समजत आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी हा प्रस्ताव दिलाय. त्यामुळे आता उद्धव ठाकरे हा प्रस्ताव मान्य करणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, हा मोर्चा कोणत्याही अजेंड्याविना असेल. कोणत्याही पक्षाचा झेंडा या मोर्चात नसेल, असे राज ठाकरे यांनी अगोदरच सांगितले आहे. त्यामुळे या मोर्चात नेमकं कोण-कोण सहभागी होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
——————————————————————————————