कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
काल गणरायाचे आगमन झाले. पावसाची उघडीप चांगलीच होती. यामुळे सुखकर्ताचे आगमन होताना भक्तांना जराही त्रास झाला नाही. नाचत, वाजत मोठ्या जल्लोषात सुखकर्ताचे स्वागत भक्तांनी केले. आजही ढगाळ हवामान आहे. हवेत उष्मा वाढत असून हवामान विभागाने दुपारी आणि संध्याकाळी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे.
मान्सून वाऱ्यांचा वेग तुलनेनं कमी झाला असला तरीही बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यात पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. ज्यामुळं बहुतांश भागांमध्ये सूर्यकिरणांना झाकोळणाऱ्या काळ्या ढगांची दाटी पाहायला मिळत असून, राज्यातील घाटमाथ्यावरील भागांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार ताशी ३० ते ४० किमी वेगाचत्या वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेच्या सोबतीनं २७ ते ३१ ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाची दमदार हजेरी असेल. याशिवाय वाऱ्याच्या याच वेगासह पावसाच्या तुरळक सरींची हजेरी उत्तर मध्य महाराष्ट्रात पाहायला मिळेल. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुण्याकडील घाटमाथ्यांवर पावसाच्या ढगांची दाटी होणार असून, त्यामुळं पाऊस बरसणार आहेच. शिवाय या भागांमध्ये दृश्यमानतासुद्धा कमी होणार असल्यानं प्रवासादरम्यान नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे.
राज्याच्या दक्षिण कोकण भागापासून थेट गोव्याच्या सीमेपर्यंत पावसासाठी पोषक स्थिती पाहायला मिळत असून, उत्तर कोकणातील जिल्ह्यांनासुद्धा हा पाऊस झोडपताना दिसणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, पारघरमध्ये मध्यम ते जोरदार स्वरुपातील पर्जन्यमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इथं मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दिवस डोक्यावर येईल तसा पावसाचा जोर तुलनेनं कमी होताना दिसणार आहे.
————————————————————————————————-