पुणे : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यातील कोकण, मुंबई उपनगर, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने चांगली हजेरी लावली असून, काही भागांत मुसळधार पाऊसही झालाय. परभणीसारख्या भागाला जोरदार पावसाचा दिलासा मिळाला असला तरी, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात हवामानात अनिश्चितता कायम आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा : ढगाळ वातावरण, पावसाचा पत्ता नाही
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या १०-१२ दिवसांत फारसा पाऊस झालेला नाही. काही भागांत तुरळक सरी पडल्या असल्या तरी, बऱ्याचशा शिवारांत अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. ढगाळ वातावरण असून, शेतकऱ्यांनी पेरण्या करून पावसाच्या प्रतीक्षेत श्वास रोखून धरलाय.
सांगली : जत, आटपाडी, खानापूर परिसरात पावसाने खूपच खंड घेतलाय. काही भागांत हलक्याशा सरी झाल्या, पण त्या पेरणीसाठी आणि पिकांच्या उगमासाठी अपुऱ्या ठरल्या. ऊसासाठी आवश्यक असलेला पाण्याचा साठा तयार झालेला नाही.
सातारा : कराड, कोरेगाव, पाटण भागांतही ढगाळ वातावरण आहे, पण भरीव पावसाचा अभाव आहे. माण आणि खटाव तालुक्यांत विशेषतः दुष्काळी स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. शेतकरी वर्ग चिंतेत असून, हवामान खात्याकडून येणाऱ्या पुढील अंदाजाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
परभणी जिल्ह्यात वरुणराजाची कृपा, ओढे-नद्यांना पाणी
परभणी शहरासह जिल्ह्यात आज पहाटेपासून झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. ओढ्यांना पाणी आले असून, देवळगाव गात येथील कसुरा नदीही भरून वाहू लागली आहे. अनेक शेतशिवारांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळालं आहे.
मात्र, दुसरीकडे सेलू शहरातील तेली गल्ली, अरब गल्ली परिसरात पावसाचे पाणी घरात शिरले. अन्नधान्य आणि घरगुती साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
हवामान खात्याचा अंदाज
भारतीय हवामान विभागाने कोकण, घाटमाथा आणि विदर्भात पुढील ४८ तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मात्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोरड्या पट्ट्यांमध्ये पावसाचा जोर अद्याप अपेक्षेप्रमाणे नाही. काही भागांत हलक्याफुलक्या सरी पडतील, असा अंदाज आहे, पण कृषीसाठी पुरेसा पाऊस अजूनही प्रतीक्षेत आहे.
शेतकऱ्यांच्या पेरण्या धोक्यात : जुलै महिना संपत आला असताना पेरण्या उशिराने झालेल्या आहेत. आता जर पुढील ५-७ दिवसांतही पावसाचा जोर वाढला नाही, तर खरिप हंगामाची तारेवरची कसरत होण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
————————————————————————————






