कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
मोठ्या सुट्टीवर गेलेला पाऊस आता पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसत आहे. धीम्या गतीनं मान्सून सक्रिय होत असून, राज्याच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात होण्याची चिन्हं आहेत.
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार पुढील २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील, कोकण-गोवा आणि मराठवाड्यातील तुरळक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. यादरम्यान ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार असून पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपातील सरींचीसुद्ध हजेरी असेल. गेल्या काही दिवसांपासून नैऋत्य मोसमी वारे एकाच जागेवर स्थिरावल्यामुळं मोसमी पावसाचा जोर कमी झाला. मात्र त्यामुळे अधूनमधून काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरीसुद्धा बरसल्या.
हवामानाच्या या प्रणालीचा परिणाम अगदी घाटमाथ्यावरही होणार असून, तिथं शनिवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर, मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शनिवारी घाटमाथ्यावर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, पुणे, सातारा, सांगली या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय सोलापूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मोसमी वारे पुन्हा सक्रिय होणार
विश्रांतीवर असणारे मोसमी वारे पुन्हा सक्रिय होण्यास परिस्थिती आणि वातावरण अनुकूल अलून, जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यानंतर राज्याच्या दक्षिणेकडील भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. पुढे जुनच्या अखेरीपासून अगदी जुलै महिन्याच्या सुरुवातीपर्यंतसुद्धा पाऊस सरासरीहून जास्त असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
———————————————————————————————–



