कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत आहे. काल भल्या पहाटे पासून ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत कोल्हापुरात जोरात पाऊस झाला. आज सकाळपासून रिमझिम पाऊस सूर आहे. वातावरण कुंद आहे. कोल्हापुरात दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पावसामुळं शहराच्या अनेक सखल भागांमध्ये शनिवारी पहाटेपर्यंत पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. काल स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक ठिकाणी झेंडावंदनाचा कार्यक्रम होता. यावेळी पावसाने चांगली उघडीप दिली.
काल व आज मुंबई शहर, उपनगरांसह नवी मुंबईतही पावसानं जोरदार हजेरी लावली आणि त्याचा थेट परिणाम रस्ते वाहतुकीपासून रेल्वे वाहतुकीवरही झाला. शनिवारी पहाटे ५ वाजल्यापासून मुंबईच्या समुद्राला उधाण आल्यानं समुद्राला ३.५९ मीटरची भरती आली आणि या भरती दरम्यान पाऊस झाल्यांन मुंबई जलमय झाली. मुंबईत मुसळधार पावसाने पाणी साचयला सुरुवात झाली आणि शुक्रवारी रात्रभर कोसळत असलेल्या पावसाने मुंबईतील सखल भागात पाणी साचलं. ज्यामुळं चुनाभट्टी, सोमैय्या मैदान परिसरात पाणी साचल्याने पूर्व द्रुतगती माहामार्ग वरील वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचं पाहायला मिळालं. तर, किंग्ज सर्कल, गांधी नगर भागात पाणी साचल्याने मुंबईहुन ठाणे, नाशिककडे जाणारी वाहतूक खोळंबल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान सकाळी ८ नंतर मुंबईतील पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरीसुद्धा साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास विलंब होत असल्यानं त्याचा थेट परिणाम रस्ते वाहतुकीवर झाला. मुंबई शहरापासून ते अगदी कल्याण, डोंबिवली, ठाणे मुंबई उपनगर परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं नागरिकांचा गोंधळ उडाला. पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला असून, मध्य रेलवेची वाहतूक शनिवारी सकाळी २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू असल्याचं स्पष्ट झालं.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर ढगफुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. मुसळधार पावसामुळे एनडीआरएफची टीम नागरिकांच्या मदतीला धावून गेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नारेगाव ,चिखलठाना परिसरात काल संध्याकाळच्या दरम्यान ढगफुटी सदृश पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत महापालिकेच्या वतीने पाणी काढण्याचे काम सुरू होते. महापालिकेचे २ जेसीबी पाणी काढण्याचे काम करत होते. अचानक आलेल्या पावसाला अनेक घरात पाणी शिरलं घराशेजारी उभा केलेल्या कार पूर्णपणे पाण्यात बुडाल्या होत्या.
————————————————————————————–