कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापुरात आज पावसाचा जोर वाढला आहे. सुट्टी नंतर गेले चार दिवसापासून पाऊस सुरु आहे. यामुळे नद्या, ओढे, नाले यांची कमी झालेली पाणी पातळी परत वाढत आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस सुरू असून, घाटमाथ्यावर येत्या काळात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. प्रामुख्याने मुंबई, पुणे, रायगड, ठाणे, पालघर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हाांमध्ये पावसाची संततधार सुरू असून अद्यापही निरभ्र आकाशाची पुसटशी चिन्हं कुठंही दिसत नाहीत.
मागील काही दिवसांपासून राज्यात सुरू असणाऱ्या पावसाचा जोर मंदावत असताना मध्येच वातावरणात होणाऱ्या बदलांमुळं पाऊस परत सुरु झाला आहे. हवामान विभागानं ही स्थिती पाहता सध्या सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा विरून जाताच राज्यातील पावसाचा जोर ओसरेल. तूर्तास हा पाऊसमारा सहन करण्यावाचून नागरिकांना दुसरा पर्याय नाही.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील २४ तासांमध्ये कोकण, मराठवाडा आणि घाटमाथ्यावरील क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. दरम्यानच्या काळात वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी इतका असेल. उत्तर कोकणामध्ये मेघगर्जना आणि वादळी पावसाचं थैमान पाहायला मिळणार असल्यानं हवामान विभागानं या भागासाठी दक्षतेचा इशारा जारी केला आहे. तर, दक्षिण कोकणापासून थेट गोव्यापर्यंतसुद्धा पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा जारी करण्यात आला आहे.
मराठवाड्यात २६०० गावांना पुराचा तडाखा
राज्यात सर्वत्र पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळं मराठवाडयाला त्याचा सर्वाधिक तडाखा बसला असून, इथं पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर, नांदेड शहराचा काही भाग जलमय झाला आहे. मराठवाड्यातील एकूण २६०० गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला असून, नांदेड जिल्ह्यात १३२ मि.मी. इतक्या रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद करण्यात आली.
राज्यात पावसाचा जोर टप्प्याटप्प्यानं ओसरेल
मुंबईत गणेशोत्सव मोठ्या दणक्यात सुरू झालेला असतानाच कोसळणाऱ्या पावसामुळं नागरिकांपुढं अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. सततचं ढगाळ वातावरण आणि पावसाच्या जोरदार, तुरळक सरींनी नागरिकांची भंबेरी उडवली आहे. शहरासह उपनगरामध्ये ही परिस्थिती पुढील २४ तासांसाठी कायम राहणार असून, कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाल्यानंतर धीम्या गतीनं राज्यात पावसाचा जोर टप्प्याटप्प्यानं ओसरेल असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
—————————————————————————————————