मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
भारतातील कोट्यवधी प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेनं सणासुदीच्या काळात दिलासा देणारी योजना जाहीर केली आहे. राऊंड ट्रिप पॅकेज या योजने अंतर्गत प्रवासी दिलेल्या मुदतीत रिटर्न तिकीट बुक केल्यास प्रवास भाड्यावर २० टक्के सूट मिळणार आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवत प्रवाशांना परतीच्या प्रवासातही स्वस्त दरात सोय मिळावी, हा या योजनेमागचा उद्देश आहे.
रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही योजना १४ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणार आहे. प्रवासी १३ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर २०२५ दरम्यानच्या प्रवासासाठी जाण्याचं तिकीट बुक करू शकतील. तर, रिटर्न तिकीट १७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२५ या कालावधीतील बुक करावं लागेल. यासाठी कनेक्टिंग जर्नी फीचर वापरणं बंधनकारक आहे.
रेल्वेनं या योजनेचे काही महत्त्वाचे नियम निश्चित केले आहेत
-
दोन्ही तिकिटं प्रवाशाच्या त्याच नावाने आणि एकाच क्लासमध्ये असावीत.
-
पहिलं तिकीट जर काऊंटरवरून बुक केलं असेल तर दुसरंही काऊंटर वरूनच बुक करावं लागेल.
-
पहिलं तिकीट आयआरसीटीसीच्या वेबसाइट किंवा अॅपवरून बुक केल्यास दुसरं तिकीट देखील त्याच माध्यमातूनच बुक करावं लागेल.
-
ही सूट फक्त कन्फर्म तिकिटांवर लागू असेल; वेटिंग लिस्ट किंवा आरएसी तिकिटांवर ही योजना लागू होणार नाही.