कोल्हापूर : प्रसारमाध्यम
काँग्रेसचे निष्ठावंत नेते, दिवंगत माजी आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी अखेर काँग्रेसचा ‘हात’ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित झाला असून बुधवारी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘देवगिरी’ बंगल्यावर भेट घेऊन पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केले आहे. लवकरच करवीर विधानसभा मतदारसंघात मोठे शक्तिप्रदर्शन करत हा पक्षप्रवेश होणार आहे. या पक्ष प्रवेशामुळे अजित पवार गटाची कोल्हापूर जिल्ह्यातील ताकद वाढणार आहेच पण काही राजकीय पेच देखील निर्माण होणार आहेत.
कॉंग्रेसचे नेते आणि माजी आमदार कै. पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे चिरंजीव राहुल पाटील यांना शिवसेना शिंदे गटाचे चंद्रदीप नरके यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला होता. या पराभवानंतर राहुल पाटील यांच्या पक्षांतराच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. काही दिवसांपासून राहुल पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. बुधवारी राहुल पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करण्याबाबत शिक्कामोर्तब केले.
गेल्या काही दिवसांत राहुल पाटील यांनी करवीर मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गटनिहाय प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. तसेच, भोगावती साखर कारखान्याचे संचालक आणि पी. एन. पाटील यांचे खंदे समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांनी राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे अजित पवार गटाची कोल्हापूर जिल्ह्यातील ताकद नक्कीच वाढणार आहे पण या प्रवेशामुळे बरेच राजकीय पेच निर्माण होणार आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे विध्यमान आमदार चंद्रदीप नरके हे माजी आमदार पी. एन. पाटील गटाचे पारंपारिक विरोधक आहेत. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव आणि चंद्रदीप नरके यांच्यात लढत झाली होती. यात राहुल पाटील यांना पराभव पत्करावा लागला होता. आता राहुल पाटील यांच्या अजित पवार गटातील पर्यायाने महायुतीतील प्रवेशामुळे स्थानिक पातळीवरील महायुतीत बरेच राजकीय पेच निर्माण होणार आहेत. आगामी काळात स्थानिक संस्थांच्या निवडणुका होणार आहेत यामुळे जागा वाटपात महायुतीचे नेते काय भूमिका घेणार याकडे नरके आणि पाटील गटातील पुढाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहेत. त्याच बरोबर २०२९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा खूप मोठा राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
—————————————————————————————